Maharashtra Election 2024 – लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांचा महायुतीवर निशाणा

गेली काही दिवस महाराष्ट्रात फिरतोय. विदर्भापासून सुरुवात केली. नागपूर, वर्धा, जालना, अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांतून नंतर पश्चिमत महाराष्ट्रात फिरलो. अनेक सभा मी घेतल्या. लोकांशी सुसंवाद केला. मला असं दिसतंय की मागची जी निवडणूक सहा-आठ महिन्यापूर्वी झाली, त्या निवडणुकीत लोक शांत होते, व्यक्त होत नव्हतो. आपलं मत मांडत नव्हते. एक प्रकारची वेगळी स्थिती होती. पण त्याच्या पाच वर्षांपूर्वी (2019) जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती. आणि आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या. तिथून ते आठ महिन्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये (लोकसभा निवडणूक 2024 ) आम्ही (महाविकास आघाडी ) एकदम 30 वर गेलो. याचा अर्थ लोकांना मोदींची भूमिका पसंत नसावी, असं जनमत महाराष्ट्रात दिसत होतं. आणि ते निवडणूक निकालात दिसलंही. पण गेल्या निवडणुकीमध्ये एकंदर चित्र न व्यक्त होणारं आणि मतदानाच्या दिवशी व्यक्त होणारं, असं चित्र बघायला मिळालं, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

आताच्या निवडणुकीत थोडी वेगळी स्थिती आहे. सत्ता ज्यांच्या हातात आहेत, त्या सत्ताधारी पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत जो फटका बसलाय त्याची नोंद त्यांनी फार गंभीरतेने घेतली आहे. लोकांना खूश करता येईल, अशा प्रकारच्या योजना त्यांनी जाहीर केल्या. पैसा जास्तीत जास्त ओतला, जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल. त्याची उपयुक्तता किती आहे, ते किती दिवस टिकणार आहे, याची माहिती जरी असली तरी आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हे सूत्र त्यांचं दिसून येत आहे, असे शरद पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 32 लाख महिलांना त्यांनी 1500 रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे. आणि त्यातून महिलांना आकर्षित करण्याची त्यांची तयारी दिसतेय. एवढे पैसे वाटले त्याचा काहीना काहीतरी परिणाम होईल, पण फार होईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण म्हणजे एका बाजूने तुम्ही मदत केली आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले. माझ्याकडे आकडेवारी आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात 67,381 अत्याचाराच्या तक्रारी आल्या आहेत. ही संख्या लहान नाही. तसेत 64 हजार महिला आणि मुली राज्यातून बेपत्ता आहेत. एका बाजूला लाडकी बहीण योजना आणि दुसऱ्या बाजूला मुलींवर अत्याचार होतोय, बेपत्ता होतात. या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी परिणाम होईल आणि आम्ही लोकांसमोर ही दुसरी बाजू मांडतोय, असे शरद पवार पुढे म्हणाले.

महिलांचा जसा प्रश्न आहे तसा दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्र यात पुढे आहे. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. सोयाबीन आणि कापूस हे राज्यातल्या काही भागातलं महत्त्वाचं पिक आहे. पण सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नसल्याने ते नाराज आहेत. शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत, असे शरद पवार म्हणाले.