सरकार हातात कसे येत नाही ते पाहतोच! – शरद पवार

देशाचे पंतप्रधान जवळपास निम्म्या वेळेपेक्षा जास्त माझं नाव घेतात ही काय साधी गोष्ट आहे का? त्यांना काटेवाडीकरांचा चमत्कार कळला!

आज केंद्र व राज्य सरकार आमच्या हातात नाही. पण लोकसभा निवडणुकीत जसे आपण केले, तसेच काम विधानसभा निवडणुकीत केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही ते मी पाहतोच. एकदा का राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला मला वेळ लागणार नाही, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले.

बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नीरावागज येथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. यावेळी त्यांना धीर देताना शरद पवार म्हणाले, नेत्यांनी काही केले नाही. पण मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. आपण एका विचाराने राहून हे दुरुस्त करू.

काटेवाडीकरांचा चमत्कार कळला

‘यावेळी एक प्रकारची शक्ती दिल्लीपासून लावण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात माळशिरस, कराड, नगर, नाशिकसह अनेक ठिकाणी आले. मोदी महाराष्ट्रात आले की, एकच विषय असायचा, फक्त शरद पवार! देशाचे पंतप्रधान जवळपास निम्म्या वेळेपेक्षा जास्त माझं नाव घेतात ही काय साधी गोष्ट आहे का? त्यांना काटेवाडीकरांचा चमत्कार कळला,’ असा हल्लाबोल शरद पवारांनी मोदींवर केला.

अमेरिकेतही बारामतीची चर्चा

‘या वेळची लोकसभेची निवडणूक वेगळी होती. लोक विचारायचे की, बारामतीत काय होतंय? ठीक आहे का? अमेरिकेत बारामतीची चर्चा असायची. दिल्ली किंवा कोणत्याही राज्यात गेलं, तर बारामतीची चर्चा असायची,’ असे सांगून शरद पवार म्हणाले, ‘लोकांना काळजी वाटायची. लोक मला खासगीत काहीतरी वेगळं सांगायचे. मात्र, माझं मन मला सांगायचं की, बारामतीकर कधी साथ सोडणार नाहीत. माझं मन जे सांगायचं, ते शेवटी खरं झालं.’