दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा – शरद पवार

दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार झाले त्यातील बहुसंख्या कंपन्या भारतीय होत्या. फक्त एकाच परदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केलेला आहे. 28 हिंदुस्थानी कंपन्यांनी सामंजस्य करार केला, त्यातील 20 कंपन्या महाराष्ट्रातील असून त्यातही 15 मुंबईतील आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते, मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. तिथून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.

शरद पवार बोलताना म्हणाले की, दावोसमध्ये कालचे जे करार झाले, त्याच्यामध्ये भारत फोर्जशी करार झाला. भारत फोर्ज ही पुणे, कराडची कंपनी आहे. त्यांनी तो कारखाना काढण्याचा निर्णय जवळपास तीन वर्षांपूर्वी घेतला होता. गडचिरोलीला जिंदाल या स्टीलच्या फॅक्टरी महाराष्ट्रात आहेच, आता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत आणि तिथून दावोसवरून एक जाहीर केलं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे, त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणणं, असा एक देखावा त्यांनी केलेला दिसतोय. असे शरद पवार यांनी बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यासोबत असणार आहेत. एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे सहाजिक आपला पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. मी उदय सामंत यांचे विधान ऐकले. दावोस येथे ते गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की, पक्ष फोडण्यासाठी गेले होते? दावोस येथे त्यांनी केलेली विधाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा जो उद्देश होता, त्याच्याशी सुसंसगत नव्हती. काही खासदारांचे फोटो मी पाहिले. तरीही ते लोक ठाकरेंची शिवसेना सोडतील, असे मला अजिबात वाटत नाही. कारण हे लोक वाटेल ते करतील पण बाळासाहेबांची विचारधारा सोडणार नाहीत. असेही शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडे अमित शाह सतत जे काही बोलतात, त्याची नोंद महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी घेतली आहे. विरोधकांनी घेतली आहे. अमित शाह यांचा बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील, अशी अपेक्षा असते.पण अमित शाह यांच्याकडून तसं काही दिसून येत नाही. खरं म्हटलं, तर अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार काही वाटत नाहीत. त्यामुळे अमित शाह कोल्हापुरात शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहिती नाही असे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की,उद्धव ठाकरे हे सतत सांगत असतात, भाजपचे हिंदुत्व खरं नव्हे, ते पुन्हा एकदा त्यांनी काल सांगितलं. ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंची देखील काल सभा झाली. कार्यक्रम घेतला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी पाहायला मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपला अधिकार आहे असं दोघांनाही वाटतं. त्याची प्रचिती काल आपण पाहिली लोकांची उपस्थिती पाहिली, तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अधिक गर्दी होती’, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.