पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या हिताचं कधीच बोलत नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच बोलतात. आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींना झोप लागत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, आघाडीच्या वतीने सत्यजित पाटील यांची निवड इथे केली आहे. महाराष्ट्रात आघाडीचे अनेक चांगले लोक आज निवडणुकीसाठी उभे केले. त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातोय. पण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, तेही आता महाराष्ट्रात सभा घेत आहेत. महाराष्ट्राचा दौरा करताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार, सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते कसा करणार या गोष्टीवर ते कधीही भाष्य करत नाहीत. त्यांचं भाष्य हे उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांवर टीका करतात. या दोघांवर टीका केली नाही तर कदाचित त्यांना झोप येत नाही. त्यामुळे या ना त्या निमित्ताने ते आमच्यावर हल्ला करतात. सत्तेचा गैरवापर करणं हे मोदींचं वैशिष्ट्य आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
‘सोरेन आणि केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. याचा अर्थ आता मोदी हळूहळू हुकूमशाहीच्या रस्त्याला जायला लागले आहेत. आणि या देशाचा जो मूलभूत अधिकार आहे, लोकशाहीचा तो अधिकार संकटात टाकायचा प्रयत्न जर कुणी केला तर तुमची माझी आपली जबाबदारी आहे की आपण सगळे जण सामुदायिकपणे शक्ती पणाला लावू, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.