मोदी युगाचा अस्त होणार, महाराष्ट्र देशाला देणार मोठा संदेश! शरद पवार यांचं भाकित

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि तापलेल्या राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे विधान केले आहे. मोदी युगाचा अस्त होणार असल्याचे भाकित शरद पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ‘दैनिक जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत मोठे विधान केले आहे. ‘महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव जवळपास निश्चित आहे. निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यास हा संदेश संपूर्ण देशात जाईल. पंतप्रधान मोदी देशाचे सरकार चालवत असले तरी आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे दोन्ही नेते एकेकाळी भाजपच्या राजकीय धोरणांवर टीका करत होते’, असे शरद पवार म्हणाले.

‘इंडिया’ आघाडीची पहिली बैठक बिहारमध्ये झाली होती. या बैठकीत नितीश कुमार यांनी मोठी भूमिका घेतली होती. भाजप विरोधात एक भक्कम पर्याय उभा करण्याची गरज का आहे? यावर नितीश कुमार यांनी भले मोठे भाषण दिले होते. अशांना घेऊन मोदी आज सरकार चालवत आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात महायुती सत्तेत न आल्यास आणि खरे तर त्यांची सत्ता येणारच नाही. आणि सत्तेची सूत्रे आमच्याकडे येणार आहेत. त्यामुळे देशात मोदी युगाचा अस्त होत असल्याचा संदेश देशात जाईल, असे मोठे भाकित शरद पवार यांनी केले आहे.

महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकणार हे आज सांगू शकत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत 48 पैकी आमच्या 31 जागा आल्या. आणि त्यांना 17 जागा मिळाल्या. त्यावेळी एक अंडरकरंट होता आणि आजही मला एक अंडरकरंट दिसून येत आहे. जनतेला परिवर्तन हवं आहे. तर पैशाने याचा सामना करण्याची महायुतीची रणनिती आहे. त्याचा किती परिणाम होईल, हे बघावं लागेल. मला वाटतं याचा (पैशाचा वापर) फारसा परिणाम होणार नाही. याचं एक उदाहरण माझ्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत एका तहसीलमध्ये मध्यरात्री लोकांना पैसे वाटण्यात आले. यामुळे निवडणुकीत याचा परिणाम होईल, अशी आम्हाला चिंता होती. पण त्या तहसीलमध्ये आम्हाला त्यांच्या तुलनेत अधिक मतं मिळाली. यावरून हे सिद्ध झालं की लोकांनी पैसेही घेतले मात्र, मत ज्याला द्यायचं, त्यालाच दिलं. हा समजुतदारपणा लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीला जनता संधी देईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे शरद पवार म्हणाले.

”बटेंगे तो कटेंगे’चा नारा ओबीसींना रोखण्यासाठी’

मोदी पंतप्रधान आहेत. आपल्या देशात समाजात फूट, प्रोपगंडा, द्वेष निर्माण करणाऱ्या भाषेपासून दूर राहिले पाहिजे आणि ही एका पंतप्रधानाची जबाबदारी आहे. आपलं राजकीय धोरण जनतेसमोर मांडणं चुकीचं नाही. विरोधकांवर टीका करणंही चुकीचं नाही. पण ज्यामुळे समाजात फुटीच्या भावना निर्माण होतील, अशी भाषा करणं शोभत नाही. पंतप्रधानांना समाजाची ते देशाची जबाबदारी सांभाळायची आहे. मोदींनी हा जो नवा ट्रेंड सुरू केला आहे, याचं कारण आहे जागृत झालेला ओबीसी समाज. हा समाज आपले हक्क मागत आहेत. आपल्या हक्कांसाठी लढत करत असलेल्या ओबीसी समाजाला रोखण्यासाठी (बटेंगे तो क्या होगा?) फूट पडली तर काय होईल? त्यामुळे मोदीसाहेब अशी भाषा वापरत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.

‘अदानींबद्दलचा अजित पवारांचा दावा खोटा’

कोणाला मुख्यमंत्री करायचं? हे महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्या राजकीय पक्षाला कोणी डिक्टेट करू शकत नाही. ते (गौतम अदानी) कुठल्या कामासाठी आले असतील, भेट घेतली असेल. मात्र, कोण सीएम? आणि कोणाचं सरकार? हा निर्णय करण्याची ताकद महाराष्ट्रात कोणाकडे असेल तर ती जनता आहे आणि राजकीय पक्षांची आहे. कुठल्या उद्योगपतीची अशी ताकद कधीच झाली नाही आणि होणारही नाही. अदानींच्या भेटीचा मुद्दा म्हटला तर, अजित पवारांना फक्त अदानीच नाही तर अनेक उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या भेटीसाठी घेऊन गेलो आहे. मात्र, तो अजेंडा महाराष्ट्राचा विकास आणि उद्योगाचा होता. आता त्यांनी (अजित पवारांनी) इतरांचेही नाव घेतले पाहिजे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचा दावा फेटाळून लावत ते सत्य नसल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत झालेल्या बैठकीत अदानीही होते, असा दावा अजित पवारांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले.