लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं भाकित केलं आहे. तीन टप्प्यांचं मतदान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना अस्वस्थ करणारं असल्याचं साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले.
केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे संकेत मिळत आहेत. ‘गेल्या निवडणुकीत 5 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली होती. आम्हाला 4 जागा मिळाल्या. एक एमआयएमला मिळाली. एकूण सहा जागा विरोधी पक्षांना मिळाल्या. आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला 30 ते 35 हून अधिक जागा मिळतील, असं आता चित्र असल्याचं शरद पवार म्हणाले.
मोदींचे मानसिक संतुलन बिघडलेले, त्यांची गाडी रुळावरून घसरलीय; संजय राऊत यांचा घणाघात
लोकांना बदल पाहिजे आहे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचाराला आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोकांचं समर्थन मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यांतील मतदान हे मोदींना अस्वस्थ करणारं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मतदानाच्या टप्प्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपला स्वर बदलला. त्यांनी मुस्लिम समाजाचा उघड उल्लेख केला. त्यांना आता धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते, असं त्यांना वाटत असावं. निवडणुकीचे टप्पे पुढे जाताहेत तसं त्यांचं स्थान हे संकटात जातंय अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये असावी, असं माझं निरीक्षण असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.