अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा; शरद पवार यांचा मिंधे सरकारला टोला

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तिजोरीत खडखडाट असल्याने एकीकडे कर्ज काढून खर्च भागवावा लागत असताना केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा गडगडाट मिंधे सरकारने केला. विरोधकांनीही याचा खरपूस समाचार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर परखड शब्दात टीका केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावरून मिंधे सरकारवर टीकेचे बाण सोडले.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये अनेक गोष्टी, तरतुदी छापून आल्या होत्या. याचाच अर्थ अर्थसंकल्पाची गुप्तता ठेवली गेली नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीत येणार नाही त्या गोष्टींची मांडणी अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. हा अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पातील तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने जातील. कारण एकंदर जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींची आकडेवारी पाहिल्यास आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी रक्कमेची उपलब्धता असल्याचे जाणवते. हा अर्थसंकल्प म्हणजे लोकांना आपण काहीतरी भयंकर करतोय असे दाखवणारा आहे. पण लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प मांडला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होईल, अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतोय, त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच अर्थसंकल्प सादर केल्याचे विधान अजित पवार यांनी केले. याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, एखाद्या गोष्टीला 100 रुपये खर्च होणार असतील आणि खिशात 70 रुपये आहेत, तर खर्च करणार कसा? तुमच्याकडे महसुली जमा किती आहे. महसुली खर्च किती होणार आहे आणि जमेपेक्षा अधिक खर्च करू म्हणत जो गॅप राहणार आहे तो कसा भरणार याची तरतूद न करता आम्ही खर्च करू म्हणणे याला अर्थ नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.

मिंधे सरकारचा अर्थसंकल्प! खिशात नाही आणा, मला ‘दादा’ म्हणा!! तिजोरीत खडखडाट, पण घोषणांचा गडगडाट!!!

लाडकी बहीण योजना, कृषी वीज बिल माफ याचा सरकारला फायदा होईल का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, प्रत्यक्ष याची अंमलबजावणी होईल का? वीजमाफीच्या निर्णयाबाबत बोलायचे झाल्यास आज वीज मंडळाची स्थिती काय आहे? त्यांना जर तोटा होतोय, तर तो भरून काढण्याची तरतूद नाही. त्यानंतरही वीजमाफीसारखे निर्णय राबवले जाणार असतील तर शंका उपस्थित होणारच. शिवाय नव्या योजनांसाठी सरकार आम्ही कर्ज काढणार म्हणत आहे. पण राज्यावर कर्जाचा किती बोझा आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यात ही आणखी भर, असेही पवार म्हणाले.

हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण! उद्धव ठाकरे यांनी सरकारला थोबडवले

आमचा धसका घेतलाय

लोकसभेला महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. 30 जागांवर थेट विजय मिळाला आणि एक सांगलीची जागा. त्यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला असून लोकसभेत ते आमच्यासोबत बसले आहेत. यावरून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आमचा धसका घेतला असून त्यातूनच हा अर्थसंकल्प सादर केला, असा घणाघात पवारांनी केला.