अमेरिकेतील प्रसिद्ध मॅग्झीन Newsweek ला दिलेल्या मुलाखतीत चीन संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी वादात सापडले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे. तर काँग्रेसनेही मोदींवर सडकून टीका केली आहे. तसेच विरोधी पक्ष संपवण्याची भाषा करणाऱ्या पतप्रधान मोदींच्या रामटेकमधील भाषणाचाही शरद पवार यांनी समाचार घेतला आहे.
‘हल्ली पंतप्रधान जे बोलताहेत ते पाहता ते त्या पदाची कितपत प्रतिष्ठा राखताहेत, हा प्रश्नच आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी एक वक्तव्य केले होते. दक्षिणेतील एक लहानसे बेट 1974 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यावेळी ते श्रीलंकेला दिले होते. याचा उल्लेख पंतप्रधानांनी पुन्हा-पुन्हा केला. यावरून मोदींनी काँग्रेस पक्ष आणि डीएमकेवर टीका केली होती. आता एकाच प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. चीनने हिंदुस्थानच्या उत्तरेकडील सीमाभागात अतिक्रमण केले आहे. याची चर्चा संसदेत आणि संसदेबाहेरही झाली होती. त्यासंबंधी हिंदुस्थानने काय पाऊल उचलले? हे ते सांगत नाहीत’, असे म्हणत शरद पवार यांनी चीनवरून पंतप्रधान मोदींना घेरले.
‘देशात एकही विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून देऊ नका, असे पंतप्रधान मोदी रामटेकमधील प्रचार सभेत म्हणाले. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीत सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्षही असतो. पंडित नेहरुंपासून ते अलीकडच्या काळातल्या प्रत्येक पंतप्रधानांनी संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा सन्मान केला. लोकशाहीत त्याची आवश्यकता आहे. असे असताना ते म्हणतात एकही विरोधक नको, विरोधकातील एकही उमेदवार निवडून देऊ नका, असेही म्हणतात. आजच संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिले आहे. पुतीन आणि मोदी यांच्यात काहीच अंतर नाही. यामुळे आपल्या सर्वांना जागरूक राहावे लागेल’, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
‘मोदींनी डरपोकपणाची हद्द पार केली’
काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींनी 2020 मध्ये चीनच्या घुसखोरी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. हिंदुस्थानच्या सीमेत कुठलीही घुसखोरी झालेली नाही. तसेच कुठल्याही ठिकाणावर कब्जा करण्यात आलेला नाही, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी 2020 ला केले होते. आता अमेरिकेच्या मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.
‘अमेरिकेच्या न्यूजवीक या मॅग्झीनला दिलेल्या मुलखातीत पंतप्रधान मोदींनी डरपोकपणाची हद्दच पार केली आहे. चीन सतत हिंदुस्थानच्या सीमेत घुसखोरी करत आहेत. पण पंतप्रधान हे मवाळ भूमिका घेत आहेत. सीमेवरील तणाव तातडीने दूर करण्याची गरज आहे. यामुळे द्वीपक्षीय चर्चेतील कटुता मागे पडेल असे म्हणत आहेत’, असे ट्विट करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.
मुलाखतीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
‘चीन सोबत हिंदुस्थानचे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. सीमेवर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी चर्चा केली पाहिजे. यामुळे वाद संपुष्टात येईल. हिंदुस्थान-चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध हे फक्त दोन्ही देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रासाठी आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत. राजनैतिक आणि लष्करी स्तरांवर सकारात्मक आणि रचनात्मक द्वीपक्षीय संबंधातून सीमांवर शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यात आणि कायम राखण्यात सक्षम होऊ’, असे पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाले.