अजित पवार गटाचे आमदार फुटणार? शरद पवारांसमोरच जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. तसंच यावेळी जयंत पाटील अजित पवारांच्या गटातील आमदारांबाबत सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमचे 8 ही खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांसाठी संघर्ष करतील. महाराष्ट्रातला कांद्याचा प्रश्न असो की द्राक्ष, ऊस, कपाशी, सोयाबीन आणि संत्र्याचा प्रश्न असो, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाचे खासदार प्रभावीपणे करतील. यासोबतच शहरी भागातील लोकांच्या समस्या, वाढती महागाई, जीएसटीची चुकीच्या पद्धतीने आकारणी अशा मुद्द्यांवर जनतेच्या वतीने संघर्ष करण्याचं काम पक्षाचे खासदार करतील, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अजित पवार गटात काय चाललंय? आताही बाहेर आमच्या सर्व नेत्यांना तुम्ही (पत्रकार) विचारलं असेल. की आमच्या पक्षात कोण येणार आहे? याची चिंता विशेष करून आमच्यापेक्षा आपल्या सर्वांना (पत्रकार) आहे. आणि त्यामुळे आपण आकडा विचारताय. पण मी या विषयावर बोलणार नाही. सध्या माझा मोबाइलचा वापर वाढलेला आहे, एवढंच सांगतो. याबद्दल आता मी काहीच भाष्य करणार नाही. कारण लोकांची मनस्थिती बदलली आहे. हा माझा गेल्या काही दिवसांतला अनुभव आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटातील काही आमदार संपर्कात आहेत का? यावर जयंत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे.

परत येणाऱ्यांसाठी कवाडं खुली ठेवली आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी जयंत पाटील यांना केला. यावर आता स्टेटमेंट करणं प्रिम्युच्युअर ठरेल. थोडासा वेळ जाऊ द्या. आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत जाऊ. तुम्हाला (माध्यमांना) अंधारात ठेवून आम्ही काहीच करणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची आम्हाला जास्त कदर आहे. जनतेची मतं एवढी प्रभावी आहेत की अनेक आमदार एकाबाजूने दुसरीकडे गेले तरी जनतेने हा कौल दिला आहे. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे. आमचा पक्ष स्वच्छ झालेला आहे. त्यामुळे हळूहळू बोलू, त्यावर घाई नाही. आम्ही योग्यवेळी योग्य ते करू, असे जयंत पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत आमदारकीच्या 150-160 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर दिसून आली. यामुळे महायुतीतील आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे लोकसभेचा हा काउंट विधानसभेला असेल का? असा प्रश्न विचारण्यात जयंत पाटील यांना विचारला गेला. हा काउंट वाढेल. कारण आम्ही केलेल्या सर्वेक्षणात मोठी बाब निदर्शनाला आली आहे. केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण बघा. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघात केंद्र सरकारबद्दल ठीक आहे, असं मत होतं. पण विधानसभेचं नाव काढलं तर 68 टक्के नाराजी लोकांमध्ये होती. त्यामुळे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत समोरच्यांना जास्त फटका बसेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

एक्झिट पोलचे आकडे खरे नाहीत, त्यावर विश्वास ठेवू नका हे आम्ही आधीच सांगितलं होतं. कारण एक्झिट पोलचे आकडे हे शेअर बाजार मॅन्युप्युलेट करण्यासाठी वापरले जातात, असा अर्थ निघायला लागला आहे. याची तपशीलवार माहिती मिळाल्यावर मी यावर अधिक बोलेन. यामुळे या एक्झिट पोलला काहीच अर्थ नाही. जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय जनतेने दिला. 10 पैकी 8 म्हणजे 80 टक्के जागांवर पवारसाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा विजय मिळवला. महाराष्ट्रात प्रत्येकवेळा सगळ्यात मोठा स्ट्राइक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असतो. पवारसाहेब ज्या बाजूने असतील त्या बाजून हा स्ट्राइक रेट चांगला राहिला आहे. म्हणून आमचे 80 टक्के उमेदवार निवडून आले, जयंत पाटील यांनी पुढे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ही 9 तारखेला दुपारी 3 वाजता मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणार आहे. देशातले वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी आणि कार्यकारिणीचे सदस्य त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारसाहेबांनी केली. यामुळे येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे अतिशय दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस हा नगर शहरात आयोजित करण्याचे ठरले आहे. नगर शहरात संध्याकाळी 5 वाजता शरद पवारसाहेबांच्या उपस्थितीत हा पक्ष स्थापना दिवस आणि जाहीर सभेचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.