बीड जिल्ह्याने स्व.काकूंचा संघर्ष पाहिला. तोच संघर्ष संदीप क्षीरसागरांच्या वाट्याला आला. काकूंचा खरा वारसदार कोण असेल तो संदीप क्षीरसागर होय. अनेक यातना भोगाव्या लागल्या. न्याय बाजू निवडल्यामुळे संकटाचा सामना करावा लागला. त्याची कामे थांबवली गेली, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याने निष्ठा सोडली नाही. माझ्या संकटाच्या काळात बीड जिल्ह्यातील तो एकमेव आमदार माझ्या पाठिशी राहिला याचा मला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. संदीप क्षीरसागर यांनी आमिषे झुगारली, तो लाचार झाला नाही. स्वाभिमानाने माझ्या पाठिशी संकटाच्या परिस्थितीत राहिला. तो माझ्या पाठिशी राहिल्यामुळे त्याला त्रास दिला गेला. त्याची कामे सत्ताधार्यांनी अडवली. थांबवली, यातना दिल्या मात्र त्याने निष्ठा सोडली नाही. हाच खरा काकूंचा वारसदार आहे. त्याला पुन्हा आमदार करायचे आहे आणि ही जबाबदारी मी तुमच्यावर देतोय असे आवाहन शरद पवार यांनी केले.
राष्ट्रीय मुद्द्यावर बोलताना पवार यांनी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. मोदींना 400 पारचा आकडा का गाठायचा होता हे त्यांच्यात नेत्याने स्पष्ट केले आहे. त्यांना संविधान बदलायचे होते त्यांचे हे स्वप्न महाराष्ट्राने उद्धवस्त केले आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीच्या पदरात झुकते माप टाकून संविधान वाचवण्याचे काम केले आहे. राज्यातला शेतकरी उद्धवस्त होत आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योगधंद्याकडे वळला पाहिजे, उद्योग धंदे वाढवले पाहिजेत या अनुषंगाने आम्ही काम केले होते. मात्र मोदी सरकारचे काम हे शेतकरी विरोधी राहिले आहे. हे त्यांच्या धोरणावरून स्पष्ट झाले आहे, असे शरद पवार पुढे म्हणाले. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार निवडून येणार आहे. तुमचाही आमदार संदीप क्षीरसागर असला पाहिजे असे आवाहन त्यांनी पुढे केले.