पश्चिम बंगालमधील जलपैयगुडी येथे काचंनजंगा एक्सप्रेसला मागून मालगाडी धडकल्याने भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेल्या कवच सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोदी सरकारवर टीका केली आहे.
केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा कवच यंत्रणा सुरू केली होती. मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर येत आहे. ही यंत्रणा असताना देखील गेल्या वर्षभरात अनेक रेल्वे अपघात झाले व त्यात अनेक प्नवाशांचे बळी गेले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ तत्कालिन रेल्वे मंत्री रेल्व सुरक्षा कवच बद्दल सांगताना दिसत आहेत. ”वारंवार रेल्वे अपघात घडत असून यात निष्पाप नागरिकांचा जीव जात असताना देखील मोदी सरकार मात्र हातावर हात ठेवून गप्प आहे. अपघात घडू नये यासाठी कधीकाळी उभारलेली रेल्वे सुरक्षा कवच यंत्रणा देखील कुचकामी ठरत असून मोदी सरकारच्या रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार जनतेसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे”, असे ट्विट शरद पवार यांच्या पक्षाने केले आहे.