…तर आज केंद्रात मोदींचं सरकार नसतं, शरद पवार यांनी ठेवलं दुखऱ्या नसेवर बोट

काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाचे गेल्या वेळी किती खासदार होते आणि आता किती कमी झाले याची नोंद मोदींनी घ्यावी. आमचे सरकार स्वबळावर आले असे ते म्हणतात. पण हे 100 टक्के खोटे असून त्यांच्याकडे बहुमत नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घेतली नसती तर आज केंद्रात मोदींचे सरकार नसते. त्यामुळे लोकांनी आपल्याला स्पष्ट बहुमत दिलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकले जाणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्यात हरकत नाही. लोकांची मानसिकता आता स्पष्ट झालेली आहे. लोकं मोदींच्या कारभारावर खुश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी.. माझी गॅरंटी. पण ती गॅरंटी चाललेली दिसत नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रचाराचा संपूर्ण भार मोदींवर होता. मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या आणि त्यातल्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा मिश्किल टोलाही शरद पवार यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला. 155 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने आमचे बहुमत ठरवले आहे. हीच स्थिती विधानसभेत असेल आणि सत्ताबदल होईल, असा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, आमची अजून सखोल चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना असे तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ. लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, आप यांनी आम्हाला मदत केली. त्यामुळे तिघे एकत्र बसणार असलो तरी डाव्या विचारसरणीचे घटक आणि जे मोदी सरकारच्या विरोधी आहेत त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर जागावाटपाची चर्चा होईल आणि पक्ष, संघटना कामाला लागतील. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असे विचारले असता, आमची आघाडी हाच सामूदायिक चेहरा आहे. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र असल्याचे ते म्हणाले.

‘जय संविधान’ घोषणेमुळे भाजपाला पोटशूळ उठण्याचे कारण काय? संजय राऊत यांचा परखड सवाल

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आणीबाणीचा निषेध ठराव मांडण्यात आला. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी आणीबाणीला उल्लेख केला होता. त्यावरून सभागृहात मोठा गोंधळही झाला. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, लोकसभा अध्यक्षांच्या भाषणत आणीबाणीचा उल्लेख त्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता. आणीबाणीला 50 वर्ष होऊन गेली. इंदिरा गांधी हयात नाहीत. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी देशासमोर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे तो प्रश्न काढायची गरज नव्हती. लोकसभा अध्यक्षांची जबाबदारी राजकीय भाष्य करणे नाही. पण त्यांना कोणीतरी सूचवले असेल आणि त्यावर ते बोलले असतील. अध्यक्षच नाहीतर राष्ट्रपतींच्या भाषणातही ओझरता उल्लेख होता तो देखील करण्याची आवश्यकता नव्हती.

दरम्यान, राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी झालेली निवड योग्यच आहे. राहुल गांधी नक्कीच प्रभावी ठरतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा जाणीवपूर्वक विरोधकांविरोधात गैरवापर केला जात असल्याचा पुनरुल्लेखही त्यांनी केला. याविरोधात संसदेत आम्ही येत्या दोनतीन दिवसात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा; शरद पवार यांचा मिंधे सरकारला टोला