लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडी एकजुटीने लढणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, आता आमचं एकच लक्ष आहे. जसे अर्जुनाचं लक्ष माशाच्या डोळ्यावर होते, तसं आमच्या सर्वांचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे. या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तीन पक्ष एकत्र सामोरे जाणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिला. या निवडणुकी तीन पक्षामध्ये जागावाटप झाले, मात्र महाविकास आघाडीत डावे, उजवे कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष व इतर लहान पक्षही होते. लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा देऊ शकलो नाहीत. मात्र विधानसभा निवडणुकीत या सहकाऱ्यांच्या हिताची जपवणूक करण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्यासोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न आहे, असेही शरद पवार म्हणाले.
मिंधे सरकारचं आयुष्य दोन-तीन महिन्यांचंच; विधानसभेत दारुण पराभव होणार, संजय राऊत याचा विश्वास
जागावाटपाबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, आमच्या तीन पक्षांमध्ये अद्याप जागावाटपासंदर्भात कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. लवकरच बोलणी करून जागांची वाटणी करू. त्यानंतर मिळालेल्या जागांवर त्या-त्या पक्षाने आपला उमेदवार निश्चित करून कामाला लागू.
विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिने हातात आहे. यापैकी दोन-अडीच महिने प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती जनतेची गरज भागवणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही त्या दृष्टीने कामाला लागू, असेही शरद म्हणाले.