महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद

आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असतं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वानं याचं भान राखायला हवं, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.

आपल्या विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी शुक्रवारी रात्री शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई केली. दरम्यान, आज सकाळी विद्यार्थ्यांनी मोदी बागेत शरद पवार यांनी भेट घेतली. पवार यांनी अर्धा तास या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्ता यादीत नाव न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.