मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत मतदानाची काही टक्केवारी वाढली, ही टक्केवारी धक्कादायक होती असे विधान शरद पवार यांनी केले आहे. तसेच 15 टक्के मतदान वाढवलं गेलं असा आरोप होता त्यात तथ्य असावं असेही शरद पवार म्हणाले.
पुण्यात शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. तेव्हा पत्रकारांसोबत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात जी निवडणूक झाली त्या संबंधित अस्वस्थता आहे त्याबद्दलचे जनमत बाबांनी हा कार्यक्रम हाती घेतला उपोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांमध्ये ही चर्चा होती की झालेल्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैश्यांचा महापूर यापूर्वी कधीही पाहिल्या गेल्या नाहीत. अनेक पातळीवरच्या निवडणुकांबद्दल होतात, तेव्हा अशा चर्चा ऐकू येतात. पण संबंध राज्या आणि देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण यंत्रणाच ताब्यात घ्यायची हे यावेळी महाराष्ट्रात पहायला मिळालं. आणि त्याचा परिणाम लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. लोकांच्या चर्चा मी गेली दोन दिवस ऐकतोय असे शरद पवार म्हणाले.
बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला आहे. पण फक्त बाबा आढाव यांनी एकट्याने ही भुमिका घेणं योग्य नाही. देशाची सुत्र ज्यांच्या हाती आहे, त्यांना या संबधित काही घेणे देणे नाही. इतकी चर्चा संपूर्ण देशात आहे. हे माहित असताना, संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलू दिले नाही. संसदीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी या प्रकरणावर बोलण्यासाठी वेळ मागितला तर संपूर्ण सभागृहाची कार्यवाही बंद करतात. एक मिनिट सुद्धा सभागृहात या प्रश्नावर चर्चा झाली नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की, संसदीय लोकशाही पद्धतीवर हा आघात आहे. शेवटी लोकांमध्ये जावं लागेल. लोकांमध्ये जागृकता आहे पण त्यांनी उठाव केला पाहिजे. आज ना उद्या याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बड्या बड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी दिसत आहेत. आज हे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल असेही शरद पवार म्हणाले.
ईव्हीएम घोटाळ्या प्रकरणी शरद पवार म्हणाले की ते दिसतंय पण त्याचा पुरावा नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचे सादरीकरण आम्हाला दिलं होतं पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. निवडणूक आयोग इतकी टोकाची भुमिका चुकीची घेईल असे आम्हाला वाटले नव्हते. शेवटच्या तासाभरातली जी आकडेवारी आलेली आहे, ती धक्कादायक प्रकारची अशी आहे. काँग्रेस कार्यकारीणीत या विषयी चर्चा झाली. आणि एकत्रित बसून इंडिया आघाडीने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवारी या वर निर्णय होईल. 15 टक्के मतं वाढवली गेली यावर शरद पवार म्हणाले की आधी विश्वास नव्हता पण आता त्यात प्राथमिकदर्शी त्यात तथ्य असावं असं दिसतंय. स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, की लोकांच्या बहुमताला महत्त्व नाही. जे काही सुरू आहे ते अशोभनीय आहे असेही पवार यांनी नमदू केले.