शरद पवारांनी दीड तास ठेवले वेटिंगवर; भुजबळ म्हणाले, बाडबिस्तरा घेऊन येथेच थांबतो, पण भेटल्याशिवाय जाणार नाही!

sharad pawar chhagan bhujbal

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून बेलगामपणे आरोप करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दीड तास वेटिंगवर ठेवले. काही केल्या भेट मिळत नसल्याने अखेर भुजबळ यांनी चादर-ब्लँकेट द्या, बाडबिस्तरा घेऊन येथेच थांबतो. पण भेटल्याशिवाय जाणार नाही, असे म्हणत शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवास्थानी ठाण मांडले.

रविवारी अजित पवार गटाच्या बारामती येथे झालेल्या सभेत छगन भुजबळ यांनी राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले देत आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत आहेत. तसेच बारामतीमधून फोन आला म्हणून मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आले नाहीत, असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर भुजबळ आज सकाळी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी दाखल झाले. मात्र, आधी वेळ न घेताच भेटीसाठी पोहचलेल्या भुजबळ यांना ताटकळत राहावे लागले.

राज्यातील तंग झालेलं वातावरण शांत व्हावं, हा या भेटीमागचा हेतू आहे. मराठा आणि ओबीसींवर अन्याय होऊ नये याकरता मी कोणालाही भेटायला तयार आहे. अगदी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटेन, असं छगन भुजबळ शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर म्हणाले.

भाजपचा काही भरोसा नाही

सध्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाजपचा काहीही भरोसा नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार गटाला स्वतंत्र लढायला लावू शकतात. ते वेळेवर आम्हाला काढायला लावतील, अशी चर्चा सध्या त्यांच्या आमदारांमध्ये आहे. त्यांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

पवार-भुजबळ भेटीत काय झाले

भुजबळ म्हणाले, वेळ न घेताच शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलो होते. त्यावेळी ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठल्यानंतर त्यांनी मला बोलावले. ते बिछान्यावरच झोपलेले होते. त्यांच्या बाजूला खुर्चीत बसून चर्चा केली. महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही केले. आता राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून काही जिह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, जरांगे किंवा हाके यांच्यासोबतच्या भेटीत सरकारकडून काय आश्वासने देण्यात आली आम्हाला काहीच माहित नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो मी तुम्हाला माहिती देतो. कुठे काय झाले. अधिवेशनात काय चर्चा झाली याबाबत मी त्यांना सांगितले. आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच, येत्या काळात सर्वपक्षीय बैठक घेण्याचं त्यांना सुचवण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. या भेटीची पूर्वकल्पना प्रफुल्ल पटेल यांना दिल्याची भुजबळ यांनी सांगितले.

आरक्षणाच्या मुद्दय़ावर शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – भुजबळ

ही राजकीय भेट नसून राज्यातील स्फोटक परिस्थितीत शरद पवारांनी लक्ष घालावं याकरता ही भेट घेतली. शरद पवार हे येत्या 2 दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी त्यांनी चर्चेसाठी तयारी दर्शविली आहे. राज्यातील हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात त्यांचा सहभाग असावा हा माझा आग्रह आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करणे हाच माझा हेतू आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळांची भूमिका दुटप्पी – अनिल देशमुख

एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर आज शरद पवार यांनी भेटायला जाऊन आपण मार्गदर्शन करा असं सांगायचं ही छगन भुजबळ यांची दुटप्पी भूमिका आहे. शरद पवार या विषयात नक्कीच मार्गदर्शन करतील, पण त्या आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात या दोन्ही समाजाला काय काय आश्वासने दिली आहेत ते सांगायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख म्हणाले.

शरद पवार यांची भेट काही केल्या मिळत नसल्याने भुजबळांनी प्रचंड आटापिटा केला. पवारसाहेबांना भेटल्याशिवाय येथून जाणार नाही, त्यासाठी कितीही वेळ वाट पहावी लागली तरी आपली तयारी आहे. चादर-ब्लँकेट द्या, बाडबिस्तरा घेऊन आता येथेच थांबतो, असे म्हणत ते ‘सिल्व्हर ओक’वर ठाण मांडून बसले. अखेर, दीड तासानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना भेट दिली. यानंतर दोघांमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावर साधारण तासभर चर्चा झाली.