एका पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही! वैचारिक लढा देण्याची हीच वेळ, शरद पवार यांची गर्जना

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. मात्र एका पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही, अशी गर्जना करीत वैचारिक लढा देण्याची हीच वेळ असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱयांमध्ये नवी उमेद जागवली.

दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत शरद पवार यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता नव्या उमेदीने लढा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. देशविघातक शक्तींसोबत आपण लढा दिला पाहिजे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष पी. सी. चाको, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

आमच्या लोकांना गळाला लावण्याचा डाव

या बैठकीत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसंदर्भात ठराव मांडण्यात आला. देशात सध्या प्रचंड द्वेषाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे देशाचे मोठी हानी होत असल्याचे ठरावात म्टले आहे. यावेळी काही महत्त्वाचे ठरावही मांडण्यात आले. सत्ताधाऱयांकडून आमच्या लोकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यामध्ये ते यशस्वी होणार नसल्याचा विश्वास यावेळी जितेंद्र आव्हाड व्यक्त केला.