कुठेतरी थांबले पाहिजे! शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत आज दिले. ‘मी आता सत्तेत नाही, परंतु राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष शिल्लक आहे. त्यानंतर राज्यसभेवर जायचे की नाही, याचा विचार मला करावा लागेल. कुठेतरी थांबले पाहिजे, असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सुपे येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. मी आता कोणतीही निवडणूक लढणार नाही. आतापर्यंत 14 निवडणुका मी लढवल्या. तुम्ही असे लोक आहात की, एकदाही मला घरी पाठवलं नाही. प्रत्येक वेळी निवडूनच देत आलात. पण कुठेतरी थांबले पाहिजे. आता मला सत्तापद नको, मात्र समाजकारण करत राहणार आणि लोकांची कामे करत राहणार आहे, असे पवार पुढे म्हणाले.

अजित पवार विविध सभांमध्ये शरद पवार तुम्हाला भावनिक करतील असे सांगत आहेत, त्याचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले, काही लोक सांगतात मी भावनिक होईन, पण भावना वगैरे काही नसतात. लोकांच्या मनात जे आहे त्यालाच लोक निवडून देतात. त्यामुळे कोणालाही भावनिक होण्याची आणि करण्याची काही गरज नाही.

बारामतीत नवीन नेतृत्व तयार करण्याची गरज 

शरद पवारांनी अजित पवारांवर तोफ डागली. तीस वर्षे त्यांना जबाबदारी दिली; तरीही बारामती तालुक्यात काहीच कामे झाली नाहीत. हातात सत्ता देऊनही त्यांना पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नाही. त्यामुळे आता नवीन नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, असे आवाहन पवार यांनी केले.

मतांचा अधिकार खरेदी करू नका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही देत आहोत घेत नाही, असे भाषणांमध्ये सांगत आहेत. तुम्ही जरूर द्या, पण लोकांचा मताचा अधिकार खरेदी करण्यासाठी देऊ नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी सुनावले. मागच्या सरकारने चुका केल्या असे शिंदे सांगतात. ते स्वतः त्या सरकारमध्ये मंत्री होते.  याचा विसर त्यांना पडलाय, असा टोला त्यांनी हाणला.

मग मोदींनी मुख्यमंत्री व्हावे

शरद पवार म्हणाले, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात ना? मग एका राज्याचे काम कशाला करता? अगदीच तुम्हाला एका राज्याचे काम करायचे असेल तर मग मुख्यमंत्री व्हा. आमची काही हरकत नाही, असा टोला पवारांनी हाणला. विमान तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात काढा, अशी मी विनंती केली होती. देशाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान मोदींनी काय जादू केली माहीत नाही. विमान तयार करण्याचा कारखाना लातूरला होणार होता तो गुजरातला नेला. वेदांताचा कारखाना महाराष्ट्रात व्हायचा होता तो गुजरातला नेला, असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पडल्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव आणि घडय़ाळ चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. या निर्णयाला शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. यावर उद्या बुधवार 6 नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.