अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ajit-pawar-sharad-pawar

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. अजित पवार गटाच्या पाच ते सहा आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. विधानभवनातच्या एका खोलीत ही भेट झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली. आता याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांना या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार गटातील आमदार परतीच्या वाटेवर आहेत का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षातील इतर प्रमुख नेत्यांना याबाबत माहिती असेल. या संदर्भात माझी कोणाशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही.

अजित पवार गटाचे आमदार परत आले तर त्यांचे पक्षात स्वागत असेल का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, कोण कोण येतंय ते बघुया. तुमच्याकडे काही नावे आहेत का? असा प्रतिप्रश्नही पवारांनी केला. तसेच आधी प्रस्ताव येऊ द्या. माझ्यासमोर तसा प्रस्ताव आलेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर तसा काही प्रस्ताव असेल तर मी यावर तुर्तास भाष्य करणार नाही, असेही पवार म्हणाले.

अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा; शरद पवार यांचा मिंधे सरकारला टोला

रोहित पवारांचा दावा

दरम्यान, अजित पवार गटाच्या 18 ते 19 आमदारांनी आमच्याशी संपर्क केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. मात्र शरद पवार यातील 10 ते 12 आमदारांनाच पक्षात घेतील असेही ते म्हणाले होते. भारतीय जनता पक्ष अजित पवार गटाला विधानसभेत फक्त 20 जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यास सांगेल, त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी राजकीय भूकंप होतो काय याकडे सर्वांच्या नजरा आहेत.