बारामतीत युगेंद्र यांच्या रुपाने महाविकास आघाडीने तरुण उमेदवार दिला आहे. ते उच्चशिक्षित पदवीधर आहेत. बारामतीची जनता या नेतृत्वाचा स्वीकार करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यात काही मतदारसंघांत मविआच्या दोन घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. दरम्यानच्या काळात सगळे व्यवस्थित झालेले दिसेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
युगेंद्र यांना काय कानमंत्र द्याल, या प्रश्नावर ते म्हणाले, मी 57 वर्षांपूर्वी बारामती तहसील कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो. त्या दिवसापासून जनतेने मला सातत्याने निवडून दिले. 57 वर्षे मी लोकप्रतिनिधी आहे. मी नव्या पिढीला एकच सल्ला देईन की त्यांनी जनतेशी बांधिलकी ठेवावी. विनम्रता ठेवावी.
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती सत्तेवर येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर पवार म्हणाले, निवडणुकीला उभा राहणारा प्रत्येक जण मी निवडून येणार असे म्हणत असतो. गेली अनेक वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. त्या काळात त्यांना बहिणीची आठवण झाली नाही. लोकसभेला जनतेने नाकारल्यावर बहीण-भाऊ आठवू लागले. त्याचे कारण लोकांनी धडा शिकवला. पुढे ते म्हणाले, बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. 1965पासून मी आजवर इतक्यांदा उभा राहिलो. सुरुवातीला काही निवडणुकांना मी इथे प्रचाराला येत होतो. नंतर तर ती जबाबदारी बारामतीकरांनीच घेतली. या निवडणुकीतही ते मविआच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.