तालकटोरा स्टेडियमवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुतळे उभारा; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी पत्राद्वारे केली आहे.

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पत्राच्या सुरुवातीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाची विनंती मान्य केल्याबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या तालकटोरा स्टेडियमवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावेत अशी अनेकांची भावना आहे. तरी नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या तालकटोरा स्टेडियमवर ही शिल्प स्थापित करण्यासाठी, आवश्यक परवानग्या देण्यासाठी, दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला निर्देश देण्यासाठी पंतप्रधानांनी सहकार्य करावे, अशी विनंती या पत्रात केली आहे.