संजय राऊत यांच्याशी मी सहमत, नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका

संजय राऊत यांच्याशी मी सहमत आहे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान मूर्खपणाचे होते असेही शरद पवार म्हणाले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100 टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की, नीलम गोऱ्हे यांनी या संबंधित भाष्य केलं. गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असे विधान करायला नाही पाहिजे होतं असं मला वाटतं.

तसेच या साहित्य संमेलनात नाही त्या गोष्टी नाही करायला पाहिजे होत्या. महाराष्ट्राच्या विधीमंडळात येऊन त्यांना तीन ते चार टर्म झाल्या असाव्यात. या टर्म त्यांनी कशा मिळवल्या हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचं एकंदर तिथला सहभाग त्यांचा विधीमंडळात प्रवेश जो झाला प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातून झाला. तो कालावधी संपल्यानंतर त्यांची कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली. राष्ट्रवादीनंतर त्या शिवसेनेत गेल्या आणि त्या आता शिंदे गटात आहेत. एका मर्यादित काळात चार पक्ष त्यांनी बदलले. त्यांचा हा अनुभव पाहता त्यांनी असे भाष्य केले नसते तर योग्य झालं असतं. संजय राऊत बरोबर म्हणाले. याबाबत संयोजकांनीही नापसंती व्यक्त केली आता यावर पडदा टाकायला हरकत नाही. पण नीलम गोऱ्हे यांनी केलेले विधान मूर्खपणाचं होतं असेही शरद पवार म्हणाले.