फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना साखर कारखान्यांची थकहमी, महायुतीचा दुजाभाव; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना फक्त थकहमी दिली जात आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या थकहमीत सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या साखर कारखान्यांच्या थकहमीत दुजाभाव होत असल्याची वस्तुस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणली. मराठा आरक्षण तसेच राज्यातील सध्याच्या वातावरणामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले होते.

 दूध अनुदान अद्याप नाही

दूध उत्पादकांना जाहीर करण्यात आलेले दूध अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे त्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी  मुख्यमंत्र्यांकडे केली. दूधदर प्रश्नावर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे संगमनेर येथून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील दूध संघांना 30 रुपये दर देणे बंधनकारक करूनही तो दिलेला नाही. तसेच अनुदानही दिलेले नाही. तसेच याबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अधिकारी स्तरावर अनेक बैठका घेतल्या; मात्र त्यातून प्रश्न सुटला नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.