
गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिसऱयांदा एकत्र आले. दोघेही एका दालनात एकत्र बसले. त्यामुळे आज राजकीय चर्चांना उधाण आले.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या साखर संकुलमधील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला वारी वारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यांच्याबरोबर सातत्याने बैठका होत असल्याबद्दलच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार हे साखरपुडय़ाच्या कार्यक्रमाला आले होते. साखरपुडा कार्यक्रम असला की परिवारातील लोक एकत्र येतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामध्ये बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याची गरज नाही. तो पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यासोबतच इतर ठिकाणी पवारसाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी मी संस्थेचा सदस्य आहे. मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही तर त्या संस्थेचा सदस्य म्हणून जातो. इतरही पक्षाचे नेते यामध्ये सदस्य आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजची ही बैठक एआयबाबत होती. ज्यातून शेतकरी वर्गाला फायदा होईल, अशा गोष्टी आहेत. त्या केल्या पाहिजेत, अशा वेळी एकत्रित बसावे लागत आहे. काही विषय राजकारणापलीकडे बघायचे असतात, निवडणुका झाल्या आहेत. जनतेच्या काही अपेक्षा आहेत. माहिती, विचार देवाणघेवाण करणे, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले.