सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांच्या गाड्यांतून उमेदवारांना केला जातोय पैशांचा पुरवठा, शरद पवार यांचा गंभीर आरोप

निवडणूक आचारसंहिता लागू असताना राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे, दारू, ड्रग्ज, सोने-चांदी जप्त करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान पकडले जाऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षांकडून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर केला जात आहे. पोलिसांच्या गाड्यांमधून उमेदवारांना पैशांचा पुरवठा केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पुण्याच्या गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडवा साजरा केला गेला. त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती. सोहळ्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या बेकायदा कृत्यांकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

मिंधे सरकारने विमानाने एबी फॉर्म पाठवले असे सांगतानाच, सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांना पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे पुरवले जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. ही गोष्ट आपण जाहीरपणेच सांगणार होतो, पण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवावे अशी विनंती केली, असेही शरद पवार म्हणाले.

फडणवीसांना कमांडो संरक्षण… हे फारच गंभीर

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर ‘फोर्स वन’चे 12 जवान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री या नात्याने फडणवीसांना आधीची सुरक्षा आहे. त्यात आणखीन केंद्र सरकारची सुरक्षा दिली गेली असेल तर राज्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे, असे शरद पवार म्हणाले.