न्यायालयाच्या बनावट आदेश प्रकरणात शरद नरवडेला अटक

जिल्हा व सत्र न्यायालयातील याचिका निकाली काढत दंड ठोठावण्याचा बनावट आदेश काढल्याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दंडाची रक्कम आपल्याला मिळावी या लालसेपोटी स्वतःचे बँक खाते दिल्याने आरोपी गावातील असल्याचे उघड होताच वेदांतनगर पोलिसांनी सापळा रचून रात्री उशीरा मुसक्या आवळल्या.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वेबसाईटवरील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या स्वाक्षरी, शिक्के आणि न्यायालयाची मोहोर यांचा दुरुपयोग करुन कलम 63, सीआरपीसीप्रमाणे दंड भरणे असे बनावट आदेश (1) विठठल दादाराव आव्हाड 51 हजार, (2) कांताबाई दादाराव आव्हाड 30 हजार, (3) रूख्मनबाई दादाराव आव्हाड 30 हजार, (4) सागर विठ्ठल आव्हाड 51 हजार, (5) संदीप हरिदास सोनावणे- 51 हजार यांना पाठविले होते. ही रक्कम भरण्यासाठी बँक खाते क्रमांक देण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच या बँक खात्याचा शोध घेतला असता तो निधोना येथील सेतु सुविधा केंद्र चालविणारा शरद दिलीप नरवडे (23) याचा असल्याची माहिती समोर आली. ही माहिती समोर येताच वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे यांच्या पथकाने शरद दिलीप नरवडे याचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्याचे लोकेशन घेतले असता मोबाईल हा निघोना येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरापर्यंत गावात छापा मारून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी. बोस यांनी दिले.