सत्ता हवी होती तेव्हा मंदिर जप केला, शंकराचार्यांचा सरसंघचालक भागवतांवर हल्ला

सत्ता हवी होती तेव्हा मंदिर-मंदिर असा जप सुरू केला होता. आता सत्तेत आल्यानंतर मंदिर शोधू नका असा सल्ला मोहन भागवत देत आहे, अशा शब्दांत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

मशिदींखाली मंदिराचा दावा करून कसे चालणार? कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदूंची मंदिरे असण्याचा दावा करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा दाखला देत शंकराचार्यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राजकीय सोयीनुसार भागवत यांनी विधाने केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशींना परत पाठवा

हिंदुस्थानात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे, अशी भूमिकाही अविमुक्तेश्वरानंद यांनी घेतली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार निषेधार्ह असून बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये केंद्र सरकार कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

उद्ध्वस्त मंदिरांचे सर्वेक्षण करावे

भूतकाळात परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची यादी तयार करून त्या वास्तूंचे सर्वेक्षण करण्यात यावे, असे आवाहन अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे. यापूर्वी हिंदूंवर अनेक अत्याचार झाले. त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. आता हिंदू समाजाला आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा असेल तर त्यात गैर काय, असा सवालही अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे.