कुमार सुरेंद्र सिंग मेमोरियल नेमबाजी स्पर्धा; महाराष्ट्राच्या शांभवीचा दुहेरी सुवर्ण धमाका

महाराष्ट्राची नेमबाज शांभवी क्षीरसागर हिने शनिवारी येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग मेमोरियल (केएसएम) नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्या, ऑलिम्पिक अंतिम फेरी गाठणाऱ्या आणि राष्ट्रीय विजेत्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

गतवर्षी लीमा येथे ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिलेल्या 16 वर्षीय शांभवीने 633.5 गुणांसह पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळविले होते. यानंतर तिने 24 शॉटच्या अंतिम फेरीत अखेरच्या प्रयत्नात 10.8 च्या निशाण्यासह हरयाणाच्या रमिताला पिछाडीवर टाकले. रमिता पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पश्चिम बंगालच्या मेहुली घोषने कांस्यपदक जिंकले. शांभवीने याआधी ज्युनियर महिला स्पर्धेत रौप्यपदक आणि युवा महिला स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले.

शांभवीसाठी महिलांच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे सर्वांत महत्त्वाचे ठरेल. कारण तिचा सामना मेहुली, रमिता आणि अलीकडच्या राष्ट्रीय विजेत्या अनन्या नायडू तसेच ज्युनियर जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्या श्रेया अग्रवाल यांच्याशी होता. रमिताने ज्युनियर महिला स्पर्धेत शांभवीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. उत्तर प्रदेशची मन्या मित्तल तिसरी राहिली.

यानंतर शांभवीने युवा महिलांचे विजेतेपदही जिंकले. या श्रेणीच्या अंतिम फेरीत तिने कर्नाटकच्या निधी मित्तलचा पराभव केला. मध्य प्रदेशची गौतमी भानोत तिसरी राहिली.