अभिप्राय – निरागस विश्वाची सफर

>> अस्मिता प्रदीप येंडे

मानवी जीवनातील स्वर्गसुख प्रदान करणारी अवस्था म्हणजे बालपण. बालपण जगतानाचे क्षण हे निरागस असतात, त्यात कोणत्याही अविचारी भावनांचा लवलेश नसतो. ज्या घरात लहान मूल असते त्या घरात चैतन्य, उत्साह असतो. मुलं जेव्हा हळूहळू मोठी होत असतात, त्यांना ताला-सुरातील ओळी ऐकायला मजा वाटते. ‘अडगुलं मडगुलं’ पासून ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’, ‘सांग सांग भोलानाथ’ अशा बालगीतांनी कित्येकांचे बालपण रम्य झाले आहे. याच बालगीतांसोबतच आणखी एक खास बालकवितासंग्रह बालचमूच्या भेटीस आला आहे. व्यास पब्लिकेशन हाऊस प्रकाशित आणि कवी सतीश सोळांकूरकर लिखित ‘शाळेमध्ये गाव’ हा बालकवितासंग्रह! अवघ्या 23 बालकवितांचा हा संग्रह बालकांच्या भावविश्वाला अधिकाधिक समृद्ध करणारा आहे. मुळात लहान मुलांसाठी कविता लिहिणे सोपे नाही, त्यासाठी कवीलाही मनाने लहान होऊन या मुलांचे जग समजून घ्यावे लागते. लहान मुले ही आजूबाजूच्या भीषण वास्तवापासून अनभिज्ञ असतात, सामाजिक, मानसिक भेदापासून ते दूर असतात. यासाठी मुलांच्या मनावर सुयोग्य भाव कोरण्यासाठी अशा बालकवितांची आवश्यकता आहे. मुलांचे कल्पनाविश्व खूप अद्भुत असते. आजूबाजूचा परिसर, नद्या-समुद्र, फुले-झाडे, प्राणी-पक्षी, चांदोबा, सूर्य, ढग अशा घटकांनाही जिवंतपणा येतो तो मुलांच्या कल्पक दृष्टिकोनामुळे!
‘ढग ढग ढग्गोबा, गडगडत आले खाली
उन्हामध्ये सुकलेली, नदी झाली ओली’
‘ढग ढग ढग्गोबा’ या कवितेत, आभाळात दिसणारे विविध आकारांचे ढग जणू कापसाचा पुंजका वाटतो. या ढगांची आभाळात जणू शाळा भरली आहे. सोबतच ढगांचा होणारा आवाज याने पाऊस पडण्याची चाहूल लागते. एकंदरीत, ढगांचा पाऊस कसा होतो याची इतकी रंजक प्रक्रिया या कवितेतून सांगितली आहे. चिऊताई, चांदोमामा, कावळेदादा, मनीमाऊ इत्यादी.
मुले ही खूप चिकित्सक असतात. त्यांना सतत नवनवे प्रश्न पडत असतात. हे असे का होते? या प्रश्नांचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत प्रश्नांचा मारा होतच राहतो. ‘लपवली शाळा’ या कवितेतील बंडूलाही असंख्य प्रश्न पडले आहेत आणि त्याची उत्तरे कवीने नेमकेपणाने दिली आहेत.
झाडाच्या फांदीला कोणाची गं भूल
टपोऱया कळीचे अलगद होते फूल
आकाशाची पाटी निळी कशी झाली?
समुद्राची शाई कोणी लवंडली?
निसर्ग नित्यनियमाने आपले कार्य करत असतो. सूर्य उगवणं, सूर्यास्त होणं, चांदोबा आकाशात निळाई घेऊन येतो. सोबत चांदण्या, समुद्राच्या लाटा, संथ वाहणारी नदी, कळीचे फूल होणं, ह्या प्रक्रिया आपल्याला साध्या वाटतात, पण ही एक प्रकारे निसर्गाची किमया आहे, याकडे लहान मुले कल्पकतेने पाहतात. एखादी जादू व्हावी तशी!
‘कधी कधी स्वप्नामध्ये मामाचे मोठे घर येते
हात धरून मला हळूच बालपणात घेऊन जाते’
सुट्टय़ांमध्ये मुलांनी भरून जाणारा पिंपळाचा पार नंतर जेव्हा एकटा उरतो तेव्हा त्या मामाचे घर आठवण बनून राहते.
‘शाळेत करतो खोडय़ा हा फार, बोलायला गेले तर गुद्दे देतो चार
लपून बसतो आरामात गं, दादाचं घर बांधू उन्हात गं’
बहीण-भावामधील लुटूपुटूची भांडणं काही नवीन नाहीत. त्यांच्यातील मारामाऱया, हट्ट, रुसवा, खोडय़ा यातून त्यांच्यातील नाते फुलत असते.
या बालकवितासंग्रहातील कविता वाचल्यावर लक्षात येते की, कवितेत अशी शब्दयोजना केली आहे, जे लहान मुलांना सहज उच्चारता येतील. पुस्तकातील रंगीत आणि आकर्षक चित्रे, साधे- सरळ यमक, शब्दातील उच्चारसौंदर्य, अभिप्रेत असलेला अर्थ, कवितेला असलेला ताला-सुराचा पाया आणि एकूणच मुलांच्या मनात आपलेपणाची, एकात्मतेची भावना रुजावी, या दृष्टीने केलेली रचना यामुळे मुलांचे संवेदनशील भाव, प्रामाणिक वृत्ती, एक चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत होईल, हे नक्की!
मुलांना अशा बालकवितांच्या विश्वात नेत पालकांनीसुद्धा या बालकविता सुंदर चालीत, तालात म्हणून त्यांचा आनंद घ्यायला हवा!

शाळेमध्ये गाव – बालकवितासंग्रह
कवी – सतीश सोळांकूरकर
प्रकाशक – व्यास पब्लिकेशन हाऊस
मूल्य – 75 रुपये