दिवाकर शेजवळ यांना ‘मूकनायक’ पुरस्कार

मराठवाडय़ातील शाक्य मुनी प्रतिष्ठानचा पहिला ‘मूकनायक’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना आज जाहीर झाला. 25 हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार, 16 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अशोका हॉल, पी. ई. एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात  सकाळी 11 वाजता पुरस्काराचे वितरण होईल.

 बीड येथे झालेल्या  बैठकीनंतर ‘शाक्य मुनी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे आणि सचिव प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी  पत्रकाद्वारे दिवाकर शेजवळ यांच्या नावाची घोषणा केली. शेजवळ 35 वर्षे पत्रकारितेत असून मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. पुरस्कार वितरण समारंभाला डॉ. जयमंगल धनराज, प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, प्रकल्प संचालक अशोक सिरसे, ज्येष्ठ पत्रकार विजय बहादुरे आदी  उपस्थित राहतील.