ढाक्यात न खेळताच शाकिबवर कसोटीला अलविदा करण्याची वेळ

icc-shakib

मायदेशात ढाका येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटा सामना खेळून कारकीर्दीचा शेवट गोड करण्याची इच्छा असणाऱ्या बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनचे स्वप्न भंगले आहे. मायदेशामध्ये वाढत्या विरोधामुळे शाकिबने सध्या तरी मायदेशात पाय न टाकण्याचा निर्णय घेतला असून आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मायदेशात अखेरचा सामना न खेळताच क्रिकेटला ‘अलविदा’ म्हणण्याची वेळ शाकिबवर येण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्याला काही तास शिल्लक राहिलेले असताना शाकिबने सामन्यात खेळणार नसल्याचे जाहीर केल्याने बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे.

हिंदुस्थान दौऱ्यादरम्यान बांगलादेश संघाच्या पदरी घोर निराशा पडली. हिंदुस्थानविरुद्धची कसोटी मालिका 2-0, टी-20 मालिका 3-0 ने गमावली. त्यानंतर आता बांगलादेश मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका उद्यापासून ढाक्यातील शेरे बांगला स्टेडियम येथे होत आहे. शाकिबने हिंदुस्थान दौऱ्यात टी-20 प्रकारातून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. तसेच, आपल्या कारकीर्दीचा अखेरचा सामना ढाका येथे खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याची संघात निवड करण्यात आली होती, मात्र मायदेशात शाकिबला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याने मायदेशात न जाण्याचा निर्णय घेत पहिली कसोटी खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे तो मायदेशात निरोपाचा सामना न खेळताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार का? याकडे साऱयांचं लक्ष आहे.

शाकिबच्या जागी मेहदी मिराजला संधी?

शाकिब पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र शाकिबच्या जागी मेहदी हसन मिराज याला संधी मिळू शकते, अशी माहिती कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने दिली आहे.