शहापुरात भाजपचा घरकुल घोटाळा, पक्की घरे असताना यादीत नावे घुसडली

भाजपच्या ताब्यात असलेल्या शहापूर तालुक्यातील गेगाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा घरकुल घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पक्की घरे असताना तब्बल 60 जणांची नावे घरकुल यादीत घुसडण्यात आली होती. याबाबत तक्रार येताच खडबडून जाग आलेल्या ग्रामसेवकांनी कागदपत्रांची पडताळणी करत 75 पैकी 60 नावांवर ‘काट’ मारली. मात्र अपात्र केलेली ही नावे नेमकी कोणी या यादीत समाविष्ट केली होती, असा सवाल करण्यात येत असून आपल्या कार्यकर्त्यांचे चांगभले करण्यासाठीच तर भाजपने हा घोटाळा केला नाही ना, अशी चर्चा शहापुरात सुरू आहे.

ऑनलाइन सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह

मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या अपात्रतेमुळे ऑनलाइन सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकाऱ्यांमार्फत गेगावमधील मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची फेर चौकशी सुरू केली असून यामध्ये काय निष्पन्न होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

घरकुलाचे अनुदान चार टप्प्यांत

गेगाव ग्रामपंचायत हद्दीत एकूण 291 कुटुंबे असून गावाची लोकसंख्या जवळपास 1 हजार 300 इतकी आहे. 2021-2022 मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत फक्त 5 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. एका घरकुलासाठी 1 लाख 20 हजारांचे अनुदान चार टप्प्यांत देण्यात येते.

1 केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2018 मध्ये घरकुल लाभार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात शहापूर तालुक्यातील गेगाव येथील 76 लाभार्थ्यांची घरकुले मंजूर झाली होती.

2 पात्र लाभार्थ्यांना 2020 मधील ग्रामसभेत मान्यता देण्यात आल्यानंतर 2024 – 25मध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी केंद्रस्तरावरून लक्षांक प्राप्त झाला. दरम्यान एका दक्ष नागरिकाने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची पक्की घरे असताना त्यांना घरकुलांचा लाभ का देण्यात येत होता.

3 या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि मुख्यमंत्री पोर्टलवर करण्यात आली होती. याची दखल घेत गेगाव ग्रामसेवकाने केलेल्या चौकशीत मंजूर झालेल्या 76 घरकुलांपैकी तब्बल 60 घरकुले अपात्र ठरवली आहेत.