ज्येष्ठ शाहीर, लोककला अभ्यासक मधुकर नेराळे यांचे सोमवारी लालबाग येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत. तमाशा कलेचे चालतेबोलते विद्यापीठ अशी शाहीर नेराळे यांची ओळख होती. तमाशा कला आणि कलावंत जिवंत रहावेत म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. शाहिरी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शाहीरांचे प्रश्न सोडवले. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मधुकर नेराळे हे लालबागमधील हनुमान थिएटरचे मालक-चालक. नेराळे यांचे वडीलोपार्जित तमाशा थिएटर असल्यामुळे लहानपणापासून त्यांचा तमाशा कलेशी संबंध आला. सत्तर-ऐंशीच्या दशकात कामगार वस्तीत हनुमान थिएटरचा दबदबा होता. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लिला गांधी ते मधू कांबीकर यांच्यापर्यंतच्या संगीतबाऱया हनुमान थिएटरात रंगल्या. नेराळे यांनी तमाशा कलेला जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे प्रयत्न केले. सुमारे 45 वर्षे हे न्यू हनुमान थिएटर हे संगीत बारीच्या तमाशा कलावंतांसाठी, ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांसाठी, लोककलावंतांसाठी आधार पेंद्र बनले. 1969 साली जसराज थिएटर या स्वतःच्या नाटय़ संस्थेमार्फत नेराळे यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर आणि प्रभा शिवणेकर यांनी गाजविलेले वग ‘गाढवाचं लगीन’ रंगमंचावर आणले. त्याचे शेकडय़ावर प्रयोग केले. ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘राजकरण गेलं चुलीत’, ‘उदं ग अंबे उदं’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र काजळी’ अशी नाटके लोकनाटय़ त्यांनी रंगभूमीवर आणली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित सातारा, सांगली, लातूर, नाशिक, जुन्नर येथील तमाशा शिबिरांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.