गोरगरीबांच्या आरोग्याशी खेळ; एक लाख शहापूरकरांचे ‘आयुष्मान’ कार्ड लटकले, कार्ड नसल्याने महागड्या रुग्णालयामध्ये उपचाराची वेळ

गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी मोठा गाजावाजा करून ‘आयुष्मान’ भारत योजना सुरू करण्यात आली. मात्र शहापुरात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून तब्बल एक लाखहून अधिक नोंदण्या रखडल्या आहेत. त्यामुळे कार्डच नसल्याने रुग्णांना नाईलाजस्तव महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या गोंधळी कारभारामुळे हा फटका बसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत विविध खासगी रुग्णालयात 1 हजार 356 आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात. पण याबाबत ग्रामीण भागात अधिक माहितीच नसल्याने ते खासगी दवाखान्यात महागडे उपचार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहापूर तालुक्यात आतापर्यंत 3 लाख 67 हजार 658 नागरिकांपैकी फक्त 1 लाख 48 हजार 871 आयुष्मान कार्ड काढल्याचे समोर आले आहे. तर 1 लाख 28 हजार 832 नागरिकांची तांत्रिक अडचणीमुळे केवायसी पूर्ण पूर्ण न झाल्याने ते रखडले आहेत तसेच 89 हजार 955 नागरिकांनी अद्यापही नोंद न केल्याने या कार्डपासून वंचित आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांसह इतरांना मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत योजना राबवली जाते. यासाठी आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे.

योजनेंतर्गत अंगिकृत रुग्णालयांसह गावपातळीवर ग्रामपंचायत ऑपरेटर, रेशन दुकानदार, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्रात जाऊन आयुष्मान कार्ड काढता येते. रेशनकार्ड, आधारकार्ड ही कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, असे आदिवासी ठाकूर संघटनेचे जानू हिरवा यांनी सांगितले.

या कारणांमुळे लटकंती
रेशनकार्डमध्ये नाव नसणे, ऑनलाइन रेशनकार्ड नोंदीत गडबड, मोबाईल आधार लिंक नसणे, स्थलांतरित, आधारकार्ड, अ‍ॅपमध्ये नाव नसणे यांसारख्या तांत्रिक अडचणी येत असल्याने नाव नोंदणीत अडचणी येत आहेत. त्या सोडवण्यासाठी वेळ लागत असल्याने नोंदणी होण्यास वेळ लागत असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जनतेने आपल्या जवळच्या अंगणवाडी, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सायबर व अ‍ॅप डाऊनलोड करून आपले नाव आयुष्मान कार्डसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे यांनी केले आहे.