शहापुरात पावसाने उडवली दाणादाण, अनेक नवीन पूल वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला; वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

>> नरेश जाधव

रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला पूर येऊन प्रचंड दाणादाण उडाली आहे. नदीजवळच असलेल्या इमारतीच्या खालील पार्किंग केलेल्या गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरले आहे.

पावसाचा जोर आणि पुरामुळे खर्डी येथे बागेचा पाडा येथील मे महिन्यात बनवलेला नवीन पूल वाहून गेला आहे. तसेच आसनगाव स्थानकानजीक पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच आटगाव-आसनगाव स्थानका दरम्यान झाड आडवे पडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

शहापूर नगरपंचायत हद्दीत भारंगी नदीचे सुशोभीकरण करताना कोणतेही नियोजन न केल्याने शहापूर जलमय झाले असून नदीच्या पात्रजवळील सर्व इमारतीत पाणी शिरले, तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रहिवाशांना, कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

खर्डी येथील बागेचा पाडा येथील मे-जून महिन्यात बांधण्यात आलेला नवीन पूल वाहून गेल्याने येथील रहिवाशांचा संपर्क तुटला असल्याचे स्थानिक रहिवासी सुरेश घावट यांनी सांगितले. वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक 1 तासापासून ठप्प झाल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. आसनगाव-माहुली रस्त्यावर गेल्या 3 महिन्यांपूर्वी झालेला रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने येथील संपर्क तुटला आहे.

भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचून रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करून नुकसान झालेल्या कुटूंबाना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी केली आहे.