ना रस्ता ना वीज ना सुशोभीकरण ना जीर्णोद्धार, वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ वनवासात, 

रामायणाची रचना करणारे वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ आणि लवकुशचे जन्मस्थळ अशी ओळख असलेले आजा पर्वत सध्या वनवासात आहे. शहापुरातील या स्थळाला सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर लाखो भाविकांची गैरसोय टाळावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार निधीतून 40 लाख तर ठाणे जिल्हा परिषदने 10 लाख रुपयांचा निधी दिला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार सर्व कामे अपूर्ण ठेवून पसार झाला आहे. त्यामुळे 50 लाखांच्या निधीचा चुराडा करूनही ना रस्ता, ना वीज, ना सुशोभीकरण, ना जीर्णोद्धार.. अशी भयंकर परिस्थिती आजा पर्वताची झाली आहे.

शहापूर हद्दीतील गुंडे-डेहणे ग्रामपंचायत हद्दीतील आजा पर्वतात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात लवकुशचा जन्म झाल्याची रामायण या महाकाव्यात नोंद आहे. तसे आध्यात्मिक पुरावे येथे आढळतात. सीतामाईचा पाळणा, गंगा प्रकटल्याचे पुरावे व नवसाचे दगड आजही या ठिकाणी पाहावयास मिळतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या आजा पर्वतावर हजारो पर्यटक येत असतात. सरकारने काही वर्षांपूर्वी या स्थळाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळावी यासाठी माजी पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी 40 लाखांचा निधी दिला. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेकडून 10 लाख रुपये पेव्हर ब्लॉकसाठी उपलब्ध करून दिले, परंतु लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे सुशोभिकरणाचे भिजत घोंगडे पडले आहे. या देवस्थानाचा विकास झाला तर परिसरातील सोळा पाडे आणि चार गावातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

ही कामे लटकली… प्रशासनाचे दुर्लक्ष

समाधीस्थळावरील दगडी बांधकामे, कमानी, मंदिराच्या भिंती, हॉलचे सर्वच कामे अपूर्ण असून केवळ पेव्हर ब्लॉक बसवले गेले आहे. केबल टाकणे, विद्युत खांब तसेच इतर कामे मागील एक वर्षापूर्वीच लटकली आहेत. जलकुंभाकडे जाणारा रस्ता कागदावरच असून ध्यानगृह, धर्मशाळा यांची दुरवस्था झाली आहे. वनविभागाचे भोजनालय तसेच स्वच्छतागृह, चेंजिग रूमचा पत्ताच नाही. पत्र्याच्या शेडमध्ये जेवण बनवावे लागत आहे. त्यातच जुन्या कामाची दुरुस्ती करताना वनविभाग खोडा घालत असल्याने कामात दिरंगाई होत असल्याचे बोलले जात आहे.