शहापुरातील आरोग्य यंत्रणा ‘सलाईन’वर, नऊपैकी चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘108’ रुग्णवाहिकाच नाही

>> नरेश जाधव, खर्डी

आदिवासीबहुल तालुका असलेल्या शहापूरच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सध्या ‘सलाईन’वर आहे. नऊपैकी चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 108 क्रमांकाची रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे रुग्ण तसेच नातेवाईकांची फरफट सुरू असून आदिवासींना नाइलाजाने महागड्या खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागतो. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. आदिवासीपट्ट्यातील आरोग्याकरिता राखून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा निधी गेला कुठे, असा संतप्त सवाल शहापूरवासीयांनी केला आहे.

शहापूर तालुक्यात टेंभा, कसारा, किन्हवली, अघई, टाकीपठार, शेणवा, शेंदूण, वासिंद, डोळखांब अशी नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर शहापूर व खर्डी येथे दोन उपजिल्हा रुग्णालये आहेत. ही रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सुविधांचा अनेकदा पर्दाफाश झाला आहे. शहापूरच्या गावपाड्यांमध्ये दुर्गम ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना झोळीतून न्यावे लागते. रस्ता नसल्यामुळे तसेच पायपीट करावी लागल्याने रुग्णांना आपला जीवही गमवावा लागतो. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळाली तर रुग्णाचा जीव वाचू शकतो, पण टेंभा, टाकीपठार, शेंदूण आणि डोळखांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सध्या सरकारी रुग्णवाहिकाच उपलब्ध नाही.

डोळखांब, कसारा, खर्डी येथील 108रुग्णवाहिका नेहमी नादुरुस्त असतात. अनेकदा फोन करूनही त्या उपलब्ध होत नाहीत. रुग्णवाहिका मिळाली तर डॉक्टर नसतात.

108 रुग्णवाहिकेबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाहीत. इमर्जन्सी किटमध्ये ओ टू सिलिंडर, मॉनिटर, ईटीटी, लॅरिगोस्कोप व इमर्जन्सी औषधी यांचा अभाव आहे.

20 मार्च रोजी रुग्णाला आणण्यासाठी जात असलेली 108 क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यातच बिघाड झाल्याने बंद पडली होती. तसेच काही काळ वाहतूककोंडीदेखील झाली.

तर शिवसेना स्टाईलने आंदोलन
रुग्णांना जलद उपचार मिळावेत यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आहे, पण ती वेळेवर न मिळाल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. ज्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका नाही तेथे ती तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचे विधानसभा समन्वयक अविनाश शिंगे यांनी दिला आहे.