मतदाराला राजासारखी वागणूक, सावलीत रांग, व्हीलचेअर आणि दिमतीला स्वयंसेवक

>> देवेंद्र भगत

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका निभावली जात असून मतदान केंद्रांवर सावलीत रांगा, वेटिंग रूम, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक, स्वच्छतागृह आणि मतदान सुरळीत पार पडण्यासाठी 60 निरीक्षकांची टीम तैनात राहणार आहे. शिवाय दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी ‘व्हीलचेअर’ आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून चारही अतिरिक्त आयुक्तांवरही निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज पालिका मुख्यालयात भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबई उपनगर जिह्यात एकूण 17 हजार 540 आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकू ण 6 हजार 387 असे मिळून एकूण 23 हजार 927 दिव्यांग मतदार आहेत. या सर्व दिव्यांग मतदारांना अत्यंत सुलभरीत्या आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. या अंतर्गत दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरून संबंधित मतदान केंद्रावर सहज व सुलभतेने येऊन मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक मदतीसाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याशी किंवा 1095 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क करूनही माहिती घेता येईल.

अडीच हजारांवर व्हीलचेअर

मतदानाच्या दिवशी दिव्यांगांसाठी 2 हजार 085 मतदान केंद्रांच्या ठिकाणी एकूण 2 हजार 549 ‘व्हीलचेअर’ उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या ‘व्हीलचेअर’वरून दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या आत ने-आण करण्यासाठी तसेच अन्य मदतीसाठी एकूण 2 हजार 085 दिव्यांग मित्र तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी अशी राहणार व्यवस्था

– मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी 613 वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण 927 वाहने नेमण्यात आली आहेत.

– मुंबई शहर जिल्ह्यात दिव्यांग मतदारांसाठी 671 वाहतूक व्यवस्थेची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या ठिकाणांवर एकूण 70 वाहने नेमण्यात आली आहेत.

– मतदानादिवशी 20 नोव्हेंबर रोजी ही वाहने 35 ‘रिंग रुट’ आणि ‘शटल रुट’वर सेवा देतील. यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी सुलभ असलेल्या बसेस, रिक्षा आणि इकोव्हॅनचा समावेश आहे.