ट्रुथ अॅण्ड डेअर गेम खेळताना 17 वर्षीय मुलीवर अत्याचार

‘टूथ अॅण्ड डेअर’ गेम खेळताना १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार रावेत येथे उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी आणि आरोपी हे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते आणि मद्यप्राशन केल्यावर मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी पीडित मुलीची एक रिल स्टार मैत्रीणदेखील फ्लॅटमध्ये उपस्थित होती.

आयुष आनंद भोईटे (वय २०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्द्र ठाकूर (वय २२, रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (वय २५, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी मूळची राजगुरूनगर येथील असून नीट परीक्षेची तयारी करण्याकरिता पिंपरीतील संत तुकारामनगर येथे एकटीच भाडेतत्त्वावर राहते. पाच वर्षांपूर्वी तिची कोंढवा येथे राहणाऱ्या एका रिल स्टार मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. रिल स्टार मुलगी पीडित मुलीच्या हॉस्टेलवर एकदिवस राहण्यासाठी आली. विशेष म्हणजे या दोघी मागील पाच वर्षांत कधीच एकमेकींना भेटलेल्या नव्हत्या. काही वेळाने मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून रिल स्टार रावेतला आरोपी मित्र भोईटे याच्याकडे गेली. भोईटे आणि तिने मद्यप्राशन केले. त्यानंतर मध्यरात्री भोईटे याचे दोन मित्र पीडित मुलीलाही रावेत येथे घेऊन आले. पीडित, रिल स्टार आणि इतर आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले. सर्वांनी मद्यप्राशन केल्यानंतर ‘ट्रुथ अॅण्ड डेअर’ गेम खेळायला सुरुवात केली.

आरोपी भोईटे याने प्रथम रिल स्टारबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितला. पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरीत धाव घेतली. मुलीकडे चौकशी केल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची चौकशी करून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. पीडित मुलीला आरोपी भोईटे याचे पूर्ण नाव, त्याचा फ्लॅट नेमका कुठे आहे, रात्री कुठे गेलो होतो, याबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे तपास करीत आहेत.