Suraj Revanna Sexual Abuse Case: सुरज रेवण्णा याला 14 दिवसांची पोलीस कोठडी

दोन पुरुषांच्या लैंगिक छळाचा आरोपाखाली अटकेत असलेल्या जनता दल (सेक्युलर)पक्षाचा आमदार सूरज रेवण्णा याला बंगळुरू न्यायालयाने बुधवारी 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. बंगळुरूच्या 42 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी 1 जुलै रोजी सूरज रेवण्णा याला 3 जुलैपर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कोठडीत पाठवले होते. मात्र आता त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे.

सूरज रेवण्णाला 23 जून रोजी एका पुरुष कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सीआयडीने गेल्या आठवड्यात सूरज रेवण्णा याची वैद्यकीय तपासणी केली होती. त्याचे डीएनए नमुनेही घेण्यात आले. सीआयडीने रेवण्णा याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या दोन पीडितांचे डीएनए नमुनेही गोळा केले आहेत. पहिल्या प्रकरणात, हसन जिल्ह्यातील एका तरुणाने आरोप केला आहे की रेवण्णाने 16 जून रोजी घनिकाडा येथील फार्महाऊसवर लैंगिक अत्याचार केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.तर दुसऱ्या प्रकरणात, तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, रेवण्णा याने तीन वर्षांपूर्वी कोविड-19 महामारीच्या काळात त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. पोलिसांनी सूरज रेवण्णा याच्या विरुद्ध कलम 377, कलम 342, कलम 506 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  जेडीएसचे माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याचा तो मोठा भाऊ असून त्याच्यावरही लैंगिक छळाचे आरोप आहेत.