कर्नाटक सेक्स स्कँडलप्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला याला न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वलला 31 मे रोजी बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यता आली होती. प्रज्वलवर कर्नाटकातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. मात्र प्रज्वल एसआयटीच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आणि तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
महिन्यापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर सेक्स स्कँडल प्रकरण चर्चेत आले. प्रज्वल रेवण्णा याच्या ड्रायव्हरने या सगळय़ा क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वलची शोधाशोध सुरू केली, मात्र तोपर्यंत तो जर्मनीला फरार झाला होता. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या होत्या. महिनाभर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. 31 मे रोजी हिंदुस्थानात परतताच पोलिसांनी त्याला अटक केली.