SEX SCANDLE : प्रज्वल रेवण्णाला बेड्या

देशभरात खळबळ उडवून देणाऱया कर्नाटकातील सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी जेडीएसचा खासदार प्रज्वल रेवण्णाला अखेर बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर रेवण्णा जर्मनीला पळून गेला होता. 35 दिवसांनी तो परत आला. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच गुरुवारी रात्री एकच्या सुमारास महिला अधिकाऱयांच्या एसआयटी पथकाने त्याला बेडय़ा ठोकल्या. आज येथील न्यायालयाने 6 जूनपर्यंत त्याला एसआयटी कोठडी सुनावली आहे.

हसनचा खासदार आणि एच. डी. देवेगौडा यांचा नातू असलेल्या प्रज्वलने जेडीएस-भाजप युतीचे उमेदवार म्हणून आताही निवडणूक लढवली आहे. मात्र त्याच्या कारनाम्यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मतदानाच्या दुसऱयाच दिवशी तो देशातून परागंदा झाला होता. तो जर्मनीला निघून गेल्याचे कळल्यावर त्याच्या ठावठिकाण्यासाठी इंटरपोलमार्फत लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला होता. बचावाचे सर्व मार्ग बंद होताच अखेर रेवण्णा 35 दिवसांनी म्युनिकहून गुरुवारी रात्री परतला आणि एसआयटीच्या महिला अधिकाऱयांनी विमानतळावरच त्याला बेडय़ा ठोकल्या.

अटकेनंतर रेवण्णाला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला रिमांड सुनावणीसाठी न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने सध्या 6 जूनपर्यंत कोठडी मंजूर केली आहे. देशात येण्यापूर्वी रेवण्णाने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज विशेष कोर्टाने आधीच फेटाळला होता.

अटक करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांचेच पथक

महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या रेवण्णाला अटक करण्यासाठी पोलिसांनी ठरवून सर्व महिला अधिकाऱयांचेच पथक विमानतळावर पाठवले. महिला गुन्हेगारांसमोर निर्भयपणे उभ्या ठाकू शकतात हे या कृतीतून अधोरेखित झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. पहाटे एकच्या सुमारास या महिला अधिकाऱयांनी प्रज्वलला अटक केली. त्यानंतर रात्रभर त्याला सीआयडी कार्यालयात ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्याला चौकशीपूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. त्याचवेळी त्याचे वकील अरुण हेही सीआयडी कार्यालयात हजर होते. मेडिकलनंतर प्रज्वलला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले.

पोटेन्सी टेस्ट आणि आवाज परीक्षण होणार

प्रज्वलची पोटेन्सी टेस्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड आणि आवाजाचे नमुनेही एसआयटी तपासणीसाठी घेणार आहे. फॉरेन्सिक टीम प्रज्वलच्या आवाजाचा नमुनादेखील घेईल, जेणेकरून व्हायरल व्हिडीओमध्ये ऐकू येणारा आवाज प्रज्वल याचा आहे की नाही हे कळू शकेल. तसेच, एसआयटीने प्रज्वलची आई भवानी रेवण्णा यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यांना 1 जून रोजी होलेनरसीपूर येथील त्यांच्या घरी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

प्रज्वलविरुद्ध तीन एफआयआर, जबाब आणि दुय्यम पुरावे

प्रज्वलविरुद्ध बलात्काराच्या आरोपाचे तीन एफआयआर दाखल आहेत. यातील प्राथमिक पुरावे हे तिन्ही पीडित महिलांचे जबाब आहेत. एसआयटीने दुय्यम पुरावेही गोळा केले आहेत. एसआयटी आरोपी आणि पीडितांच्या सेलपह्न टॉवर लोकेशन माहितीसारख्या तांत्रिक डेटाचीही पडताळणी करत आहे. डझनभर साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी एसआयटीने हसनमधील प्रज्वलच्या शासकीय निवासस्थानातून बेड, खाटा आणि फर्निचर जप्त केले. त्यांचीही फॉरेन्सिक चिकित्सा होणार आहे.