एक्सपायरी डेट’चा झोल अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ; आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेची कारवाई

मुदत संपलेल्या अमूल, पेप्सी को कंपनी ब्रॅण्डच्या विविध खाद्यपदार्थ व पेयावरील तारखेचा झोल करून त्याच्या पुनर्विक्रीबरोबरच नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱया एका समाजपंटकाचा गोरखधंदा आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेने उद्ध्वस्त केला. पोलिसांनी शिवडी परिसरात कारवाई करत जवळपास साडेआठ लाख किमतीचा मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

शिवडी पश्चिमेकडील जवाहर कंपाऊंड येथील अस्तर मार्पेटिंग प्रा लि. कंपनीच्या गाळा नंबर 4 अमध्ये एक्सपायरी डेट संपलेल्या नामांकित कंपनीच्या खाद्यपदार्थ व पेयांवरील ती तारीख, बॅच नंबर आणि अन्य नमूद माहिती शिताफीने थिनरच्या सहाय्याने मिटवून त्यावरच इंजेक्ट प्रिंटरच्या सहाय्याने नवीन एक्सपायरी डेट, बॅच नंबर व अन्य माहिती नमूद केली जाते. मग ते पदार्थ व पेय पुन्हा शहरातील विविध दुकांनांमध्ये विक्रीसाठी पुरविले जात असल्याची खबर आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेत्तत्वाखाली अंमलदार महेश नाईक, चंद्रकांत वलेकर, यादव व पथकाने एफडीएच्या अधिकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा त्या गाळ्यात जिगर सावला (36) हा तरुण एक्सपायरी डेट व अन्य माहितीचा खाद्यपदार्थांच्या पाकिटावर झोल करताना मिळून आला. याप्रकरणी आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जिगर सावला याला पुढील कारवाई करता आर. ए. के. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनास्थळावरून पोलिसांनी मुदत संपलेल्या अमूल कंपनीचे घी, बासुंदी, जिरा टोस्ट, कुकीज,चॉकलेट, अमूल कॉफी तसेच पेप्सीको कंपनीचे ले चिप्स आदी पदार्थ मिळून आले. आठ लाख 75 हजार किमतीचा हा मुदत संपलेला खाद्यपदार्थांचा साठा जप्त करून तो एफडीए अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.