महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का पळवले याचे उत्तर द्या! आदित्य ठाकरे यांचे मोदी, शहांना आव्हान

आपल्या मराठी माणसाचा-भूमिपुत्राचा कणा मोडण्यासाठी मोदी सरकारने एकामागोमाग एक प्रकल्प गुजरातला पळवले. वेदांता फॉक्सकॉनसारखे पाच ते सहा प्रकल्प गुजरातला पळवले. महाराष्ट्रातील उद्योग-प्रकल्प गुजराला का पळवले याचे उत्तर मोदी-शहांनी महाराष्ट्राला द्यावे, असे आव्हान शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिले. आता आपले आर्थिक बळ मोडून काढायचे आहे. म्हणून मोदी सरकारचा डोळा मुंबईवर आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

शिवडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार अजय चौधरी यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी महायुती व मोदी सरकारवर हल्लाबोल केला. या सभेला खासदार अरविंद सावंत, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार दगडू सकपाळ, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

z भाजपला आता कळले की मुंबई आपण जिंकू शकत नाही आणि शिवसेनेशिवाय तर अजिबात जिंकू शकत नाही. मग त्याने पुढचे पाऊल काय उचलले तर मुंबई महानगरपालिकेची दोन वर्षे निवडणूक घेतली नाही. आपली मुंबईची सहाशे कोटी रुपयांची तूट होती ती आपण 92 हजार कोटी रुपयांच्या शिलकीमध्ये आणली याकडे त्यांनी लक्ष वेधले.

z महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा समाचार घेताना ते म्हणाले, या सरकारला महिलांवरील अत्याचार दिसले नाहीत. गौरी लंकेशच्या मारेकऱयांना एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पक्षात घेतले तेव्हा लाडकी बहीण दिसली नाही. आता विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागला तेव्हा लाडकी बहीण योजना आठवल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र की अदानीराष्ट्र

ही निवडणूक आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या महाराष्ट्रासाठी खास करून मुंबईसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचे नाव महाराष्ट्रच राहाणार की अदानीराष्ट्र होणार हे तुम्ही ठरवायचे आहे. कारण आपली मुंबई लढून मिळवली आहे. पण आज याच मुंबईसाठी आपल्याला लढायला लागत आहे. रस्त्यावर यावे लागत आहे. धारावीच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी शिवसेनेने आंदोलन केले.

z धारावी प्रकल्पाचा फक्त धारावीवर नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण मुंबईवर होणार आहे. गेल्या दोन वर्षांत मराठी माणसाचा, भूमिपुत्रांचा कणा मोडण्यासाठी आपली स्वप्नं चिरडण्यासाठी सर्व उद्योग गुजरातला पळवले. पावणेदोन लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेला. एक लाख नोकऱ्या महाराष्ट्रातून गेल्या तसेच बल्कड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प पळवला. एअर बस प्रकल्प गुजरातला पळवला. पाच-सहा मोठे प्रकल्प गुजरातला नेले. त्यातून साडेचार ते पाच लाख नोकऱ्या मिळणार होत्या. प्रकल्प पळवणाऱ्या भाजपला आपण मतदान करू शकतो का, असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.

हौसिंग पॉलिसीची होळी करणार

मुंबई महापालिकेत गेली दोन वर्षे निवडणुका न घेता काही कमिटय़ांना बाजूला ठेवून एकामागोमाग एक मुंबईचे भूखंड अदानीच्या घशात घातले जात आहेत. धारावीसाठी अदानींना 540 हेक्टरचा भूखंड फुकटात दिलेलाच आहे. पण त्याहून अधिकची मिठागरे दिली आहेत. एक हजार 80 हेक्टर जमीन अदानींना फुकटात का द्यायची? अदानींना मुंबईतल्या जमिनी फुकटात का द्यायच्या, असा सवाल त्यांनी केला. मुंबईत गावठाणे, कोळीवाडे आहेत. ड्राफ्ट हौसिंग पॉलिसीमध्ये एकरांवर वसलेले कोळीवाडे जे आहेत ते स्क्वेअर फुटात डांबायचे आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोळीवाडा आणायचा आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार येईल त्या दिवशी ड्राफ्ट हौसिंग पॉलिसीची होळी करण्याची घोषणा त्यांनी केली.