>> विवेक पानसे
राज्यात वाढलेल्या थंडीचा कडाका रब्बी पिकांसाठी पोषक ठरत असून, गहू, ज्वारी, हरभरा यांसह अन्य रब्बी पिके जोमाने वाढत आहेत.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला फेंगल चक्रीवादळामुळे राज्यभरात ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणाचा परिणाम हा थंडीवर झाला होता. थंडी कमी झाल्यामुळे रब्बी पिके संकटात आली होती. गहू, ज्वारी, हरभरा पिकांवर रोग पडण्यास सुरुवात झाली होती. खरिपाच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. त्यात थंडीच्या अभावामुळे रब्बीतील पिकेदेखील धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची लाट आली. हे वातावरण रब्बी पिकांसाठी पोषक ठरले.
सध्या जिल्ह्यात विविध भागांत गहू, ज्वारी, हरभरा, कांद्याची पेरणी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांत वाढती थंडी आणि पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका वाढल्याने त्याचा फायदा रब्बी पिकांना होत असून, गहू आणि ज्वारी अधिक बहरली आहे. पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्याचा सर्वात जास्त फायदा गहू या पिकाला होत आहे. वाढत्या थंडीमुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर दिसत नाही. त्यामुळे अधिकाधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
– गेनबा शिंदे (शेतकरी)
पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता
■ गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ होऊ लागली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान हे 15 अंशांवर येऊन ठेपले आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवस दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या ढगाळ वातावरणाचा परिणाम पुन्हा पिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.