प्रभारी आणि अतिरिक्त कारभाराच्या खांद्यावर चालणाऱया पालिकेच्या सात वॉर्डना आता पूर्णवेळ सहायक आयुक्त मिळणार आहेत. एमपीएससीकडून या सहायक आयुक्तपदासाठी उमेदवारांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. महिनाभराच्या प्रशिक्षणानंतर हे सहायक आयुक्त पालिकेच्या सेवेत रुजू होणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या 27 वॉर्डमधील सात वॉर्डना सहायक आयुक्त नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत होता. प्रभारी नियुक्तीच्या अधिकाऱयांकडून कामावर मर्यादा येत असल्यामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. याबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनेक वेळा आवाज उठवून पालिकेने वाऱयावर सोडलेल्या वॉर्डबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता पालिकेला एमपीएससीकडून पूर्णवेळ सहायक आयुक्त मिळणार असल्याने नागरिकांची कामे मार्गी लागणार आहेत. या सहायक आयुक्तांची नियुक्ती निवडणूक आचारसंहितेत अडकली होती. मात्र आता आचारसंहिता संपल्याने सहायक आयुक्तांची नियुक्ती पूर्णवेळ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशी झाली कार्यवाही
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबई महापालिकेसाठी सात सहायक आयुक्त जून 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तपदाच्या 16 जागांसाठी जाहिरात दिली होती. मात्र न्यायालयीन खटल्यांमुळे ही भरती गेली तीन वर्षे झाली नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. आयोगाने ऑक्टोबरमध्ये ही सात उमेदवारांची शिफारस यादी जाहीर केली आहे. आता या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
असे आहेत उमेदवार
- उज्ज्वल यादवराव इंगोले
- योगिता सहदेव कोल्हे
- दिनेश पल्लेवाड
- अर्जुन सिदराम क्षीरसागर
- योगेश रणजितराव देसाई
- कुंदन रामसिंग वळवी
- नितीन चंद्रप्रताप शुक्ला