समृद्धी महामार्गावर दोन कार एकमेकींवर धडकल्याने भीषण अपघाताची घटना शुक्रवारी रात्री जालना येथे घडली. इर्टिका आणि स्विफ्ट डिझायर कार धडकल्याने अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इर्टिका कार नागपूरहून मुंबईला येत होती. महामार्गावरील जालना येथील कदावंची गावाजवळ गाडीत पेट्रोल भरल्यानंतर इर्टिका विरुद्ध दिशेने येत होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर वेगाने समोरून आल्याने दोन्ही कार एकमेकींवर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवासी बाहेर रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
या अपघातात फैजल शकिल मंसूरी, फैयाज मंसूरी, अलथमेस मंसूरी (सर्व रा. मालाड पूर्व) आणि डिझायर कारमधील चालक संदीप माणिकराव बुधवंत (वय – 28), विलास सुदाम कायंदे (वय – 28), अनिकेत चव्हाण (वय – 30, तिघेही रा. उमरखेड ता. देऊळगाव राजा) आणि प्रदीप लक्ष्मण मिसाळ (वय – 30, रा. पिंपळगाव बु. ता. देऊळगाव राजा) हे 6 जण जागीच मृत्यू झाला, तर इर्टीकामधील शकील मंसूरी, अल्ताफ मंसूरी, आणि चालक राजेश कुमार (रा. मालाड पूर्व) आणि डिझायरमधील एक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ संभाजीनगर आणि जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सातही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार महामार्गावरुन बाजूला हटवण्यात आले.