छत्तीसगड–तेलंगणा सीमेवर सात नक्षलवाद्यांचा खात्मा, जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगड-तेलंगणा सीमा परिसरात पोलिसांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या प्रमुखासह सात नक्षलवादी ठार झाले. तेलंगणातील मुलुगु जिह्यातील एतुरागम या जंगल परिसरात ही चकमक झाली. चकमकीनंतर पोलिसांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला. सुरक्षा दलाचे जवान शोधमोहीम राबवत होते. अशातच नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाले. यामध्ये माओवाद्यांच्या प्रमुख नेत्याचाही समावेश आहे.

ठार झालेल्यांची ओळख पटली असून, कुरसम मंगू (35), एगोलाप्पू मल्लैया (43), मुसाकी देवल (22), मुसाकी जमुना (23), जय सिंह (25), किशोर (22) आणि कामेश (23) अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षा दलाने माओवाद्यांकडून एके-47, जी 3, इंसास राइफलशिवाय अन्य हत्यारे आणि स्पह्टके जप्त केली. मुलुगु जिह्यात पुन्हा एकदा माओवादी संघटना तोंड वर काढत असल्याने मोठय़ा कालावधीनंतर या भागात चकमक झाली. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या कारवाया सुरू करण्याचा प्रयत्न केला असून, 21 नोव्हेंबर रोजी त्यांनी जिह्यातील दोन आदिवासी लोकांची हत्या केली होती.

मोठी दुर्घटना टळली

छत्तीसगडमधील कांकेर जिह्यात सुरक्षा यंत्रणेच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. नक्षलवाद्यांनी पुरलेली आठ स्पह्टके सुरक्षा कर्मचाऱयांनी जप्त केली आहेत. कोयलीबेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटखडियापारा गावाजवळ प्रत्येकी 2-3 किलोग्रॅम वजनाचा आयईडीएस सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव रक्षक यांच्या हाती लागला. 30व्या बटालियनच्या संयुक्त पथकाने मायनिंग ऑपरेशन सुरू असताना ही कारवाई केली. परिसरात ठेवलेल्या आयईडीबद्दल माहिती मिळताच ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱयांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी सात स्पह्टके स्टीलच्या टिफिनमध्ये आणि कुकरमध्ये पॅक करून पुरून ठेवली होती. वेळीच माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. बॉम्ब निकामी पथकाने आयईडी निष्प्रभ केले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱयाने दिली.