
महापालिकेकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता कोथरूड, कर्वेनगरकडे जाणाऱ्या राजाराम पुलाचा एक भाग देखभाल दुरुस्तीसाठी बंद केल्याने सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मुंग्यासारखी एकामागोमाग वाहने आणि हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे सिंहगड रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले होते. भर उन्हात सुमारे सात ते आठ किलोमीटर रांगा लागल्याने पुणेकर चार तास कोंडीत अडकून पडले होते.
राजाराम पूल येथे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाला किमान महिनाभर लागणार आहे. पुलावर कोथरूड-कर्वेनगरकडे जाणाऱ्या भागाचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढील महिन्यात कर्वेनगरकडून सिंहगड रस्ता परिसरात येणाऱ्या भागाचे काम करण्यात येणार आहे. याबाबत सर्व परवानग्या मिळाल्यानंतर पुलाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू करायचे, याच्या सूचना नसताना संबंधित ठेकेदाराने सोमवारी सकाळपासून कोथरूड, कर्वेनगरकडे जाणाऱ्या राजाराम पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. मात्र, माध्यमांना अथवा परिसरातील नागरिकांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे आठवड्याच्या सुरुवातीला सकाळी सर्वजण घराबाहेर पडले. मात्र, दुरुस्तीच्या कामाची कोणतीही माहिती नसल्याने पुणेकर नागरिक सिंहगड रस्त्यावर कोंडीत अडकले. कालव्यालगतचा पर्यायी रस्ता आणि मुख्य सिंहगड रस्ता या सर्व भागात वाहतूककोंडी होती. सकाळी साडेआठपासून ते अकरा वाजेपर्यंत वाहतूककोंडी होती. कालव्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात गाड्या अडकल्या होत्या. यात रुग्णवाहिकादेखील अडकल्या होत्या. राजाराम पूल येथे बंद केल्यामुळे थेट धायरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राजाराम पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगीदेखील मिळाली होती. मात्र, 1 मे पर्यंत हे काम न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. ठेकेदाराने परस्पर काम सुरू केले होते. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत नव्याने उभारलेला उड्डाणपूल सुरू होत नाही, तोपर्यंत हे काम थांबवण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.
युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे महापालिका.