जर्मनीत ख्रिसमस मार्केटवर हल्ला; 2 जणांचा मृत्यू, सात हिंदुस्थानी नागरिक जखमी

जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सात हिंदुस्थानी नागरिकही जखमी झाले आहेत. याबाबत माहिती देताना हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या सांगण्यात आलं आहे की, “आम्ही या क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.” निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही जर्मनीतील हिंदुस्थानी नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत.

7 हिंदुस्थानी नागरिक जखमी

जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील हल्लयात 7 हिंदुस्थानी नागरिकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 3 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. हिंदुस्थानी मिशन सर्व जखमींच्या संपर्कात असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये एका व्यक्तीने वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांवर हल्ला करत आपल्या कारने उडवलं. ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या 50 वर्षीय सौदी अरेबियाच्या डॉक्टरला अटक केली आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने या अपघाताचा निषेध केला आहे.